चिपळूणात पूर ओसरतोय पण नद्या धोक्याच्या पातळीवरच, महापुरात 10 जणांचा मृत्यू: 1400 लोकांची सुटका

चिपळूणला आलेला महापूर ओसरू लागला असला तरी अतिवृष्टी सुरू असल्याने चिपळूणवासियांचा धोका टळलेला नाही. एनडीआरएफ, तटरक्षक दल, चिपळूण नगरपरिषद, रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स आणि स्थानिक मच्छिमारांनी बचावकार्यात सहभाग घेतला असून आतापर्यंत 1400 हून अधिक जणांची सुटका करण्यात आली आहे. महापुराचा फटका कोविड सेंटरला बसल्याने 8 जणांचा मृत्यू झाला, तर पुरात वाहून गेलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यात पोसरे येथे दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला असून 14 जण बेपत्ता आहेत.

गुरूवारी आलेल्या महापुरामध्ये चिपळूण शहर उध्वस्त झाले. कोकणात निसर्गाचा प्रकोप पहायला मिळाला. अतिवृष्टीमुळे हाहाःकार उडाला. चिपळूण शहरातील महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी गुरूवारी संध्याकाळीच स्थानिक मच्छिमार, रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स, राजू काकडे हेल्प फाऊंडेशनचे पथक मदतकार्यात सहभागी झाले. एनडीआरएफ पथक बोटींसह मदतकार्यात सहभागी झाले. सायंकाळपर्यंत 1400 हून अधिक नागरिकांना पुरात बाहेर काढण्यात आले.

चिपळूणातील एका कोविड केअर सेंटरमधील 8 कोरोना रूग्णांचा पुरात मृत्यू झाला. कोविड केअर सेंटरमधील रूग्णांना वाचविण्यासाठी एक बोट गेली मात्र पाण्याच्या करंटमुळे ती पलटी झाली. वाहून गेलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काही घरात मृतदेह असल्याची भीती व्यक्त होत आहे. वशिष्टी नदीच्या पुलाचा भराव वाहून गेल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद करण्यात आला.

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मदतकार्य सुरू -उदय सामंत

सध्या चिपळूणात पिण्याचे पाणी, अन्नाची गरज आहे. आम्ही पाण्याचे टॅंकर मागवले होते मात्र ते कोल्हापुरात पूर आल्याने निळे येथे अडकले आहेत. तरीही आम्ही पिण्याचे पाणी, फरसाण, मेणबत्ती, कपडे याची मदत करत आहोत. काही स्वयंसेवी संस्था मदतीकरिता पुढे आल्या आहेत. विम्याबाबतही आज तातडीने बैठक घेतली. उद्या चिपळूणात पंचायत समितीच्या सभागृहात व्यापारी वर्गाची विमाबाबत बैठक होणार आहे. पुराचे पाणी ओसरत असले तरी धोका कायम आहे. सर्वच नद्या धोका पातळी ओलांडून वाहत आहे त्यामुळे आणखी काही दिवस सतर्क रहाणे गरजेचे आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या