चिपळूणात हातभट्‌टीवर धाड, लांजात गावठी दारुची वाहतूक पकडली; कारवाईत 2 लाखांचा मुददेमाल जप्त

चिपळूण तालुक्यातील सावर्डे कोष्टीवाडी येथे हातभट्‌टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून 97,700 रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील अनेक हातभट्‌ट्यांवर सातत्याने छापे मारुन गावठी हातभट्‌टी दारुचा मोठा साठा व मुददेमाल जप्त केला आहे.

चिपळूण तालुक्यातील सावर्डे कोष्टीवाडी येथे हातभट्‌टी सुरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या हातभट्‌टीवर भरारी पथक व चिपळूण कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली़. यावेळी गावठी दारु, रसायन असा एकूण 97,700 रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

याठिकाणी दारुनिर्मितीसाठी लागणारे सुमारे 3,800 लिटर रसायन आढळून आले़. यावेळी दिपाली दिलीप (वय 48), रेश्मी रवींद्र वारे, (वय 49), मंजिरी मारुती भंडारी, (वय 36), अशोक अनंत भंडारी, (वय 49 वर्षे सर्व रा. सावर्डे, ता.चिपळूण) यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुसर्‍ या एका कारवाईत मुंबई-गोवा महामार्गावर गावठी दारुची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लांजा कार्यालयाने वाटूळ येथे उपनिरिक्षक आमत पाडाळकर यांनी सापळा रचला असता गावठी दारुची वाहतूक करणारी एक लाल रंगाची मारुती अल्टो कार मिळून आली.

या कारवाईत 300 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली. वाहनासह एकूण 1,02,600 रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. वाहनचालक शुभम नरेंद्र पाटील (वय 26, रा. मिरजोळे) याला ताब्यात घेण्यात आले़. ही कारवाई उपअधीक्षक व्ही.व्ही.वैद्य यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक शरद जाधव, सुरेश पाटील, उपनिरिक्षक अमित पाडाळकर, भागवत, किरण पाटील, निखील पाटील, जवान विशाल विचारे, अतुल वसावे, सावळाराम वड, ओंकार कांबळे, संदीप विटेकर, अनिता नागरगोजे यांनी केली.

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन काळात अवैध गावठी दारुची वाहतूक व विक्री होऊ नये म्हणून करडी नजर ठेवणार असल्याचे उपअधीक्षक व्ही.व्ही.वैद्य यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या