कौटुंबिक वादातून चुन्नाभट्टी येथे नातेवाईकांमध्ये तुफान राडा झाला. या वेळी एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली, तर तिघांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणी चुन्नाभट्टी पोलिसांनी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आसीफ हा त्याची वहिनी सबा खान हिचे कपडे घेण्याकरिता वहिनीचा भाऊ सलमान याच्या कुर्लाच्या इंदिरा नगर येथील घरी गेला होता. त्या वेळी आरोपींनी बहीण सबाने घरच्यांच्या संमतीशिवाय दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून सबाचा दीर आसीफ खान याच्या डोक्यात दगडाचे घाव घातले, तर आरीफ तसेच अदनान व इम्रान यांच्या पाठ, पोट व कानावर चाकूने वार करून तिघांवर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी चुन्नाभट्टी पोलीस ठाण्यात खून, हत्येचा प्रयत्न आदी कलमान्वये गुन्हा दाखल करून अमन खान (20), अनस शेख (28), समा शेख (28), शकील शेख (23), हुसना शेख (49) आणि सलमान शेख अशा सात आरोपींना अटक केली आहे.
दोन घोडागाडय़ांमध्ये महामार्गावर जीवघेणी शर्यत
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विलेपार्ले ते खेरवाडी अशी घोडागाडय़ांची जीवघेणी शर्यत खेळणाऱया एकाला विलेपार्ले पोलिसांनी दणका दिला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गावर दोन घोडागाडय़ांमध्ये शर्यत खेळली जात असल्याचा व्हिडीओ विलेपार्ले पोलिसांना मिळाला. पोलिसांकडून त्या व्हिडीओची खातरजमा केली जात असताना दोघे घोडय़ांना अमानुषपणे काठी व चाबकांचे फटके मारून पळवत असल्याचे आढळून आले. तसेच लियोनल प्रायर्स हा व्यक्ती एक घोडा चालवत असल्याचे व त्याने त्याच्या फेसबुकवर घोडा गाडीच्या शर्यतीचा व्हिडीओ ठेवला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विलेपार्ले पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. तसेच चार घोडे जप्त केले.