चर्चगेट येथील मोटरमनच्या कॅन्टिनचे आज उद्घाटन; आठ महिन्यांनंतर होणार मोटरमन, ट्रेन मॅनेजरची गैरसोय दूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चर्चगेट रेल्वे स्थानकातील आगीच्या घटनेनंतर बंद केलेली मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरची कॅन्टिन अखेर आठ महिन्यांनंतर पुन्हा सुरू केली जाणार आहे. कॅन्टिन बंद राहिल्यामुळे पहाटे लवकर डय़ुटीवर येणाऱया मोटरमन-ट्रेन मॅनेजरची गैरसोय होत होती. या प्रश्नावर दै. ‘सामना’ने वेळोवेळी आवाज उठवला होता. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता कॅन्टीनचे उद्घाटन केले जाणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर 1100 हून अधिक मोटरमन व ट्रेन मॅनेजर आहेत. या मार्गावरील मुख्य स्थानक असलेल्या चर्चगेट स्थानकातून बोरिवली, विरार आणि डहाणूपर्यंत लोकल ट्रेन चालवल्या जातात. येथील मोटरमन-गार्डच्या मुख्य लॉबीमध्ये सतत कर्मचाऱयांची ये-जा सुरू असते. मोटरमनच्या सोईसाठी अनेक वर्षांपासून स्टेशन मास्तर कार्यालयासमोर कॅन्टिन सुरू होते. मात्र कॅन्टिनच्या खाली असलेल्या केक शॉपला गेल्या वर्षी 5 जूनला आग लागली आणि नंतर ते
कॅन्टिन सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले. पुढे वेळीच कॅन्टिन पूर्ववत सुरू केले नाही. त्यामुळे मोटरमनना उपाशीपोटी लोकल ट्रेन चालवाव्या लागत होत्या. याबाबत दै. ‘सामना’ने वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या. तसेच मोटरमन-ट्रेन मॅनेजरच्या विविध संघटनांनी आंदोलन करण्याची तयारी दर्शवली. त्याची गंभीर दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने 6 फेब्रुवारीला सकाळी कॅन्टिनचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह यांच्या हस्ते कॅन्टिनचे उद्घाटन केले जाणार आहे. आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कॅन्टिन सुरू होत असून डय़ुटीवर चहानाश्त्याची सोय होणार असल्याने पश्चिम रेल्वेच्या मोटरमन-ट्रेन मॅनेजरमध्ये आनंदाचे वातावरण आहे.