सिडकोच्या गलथान कारभाराचा फटका; 12 कोटींच्या निधीसाठी उरण बायपासचे काम 23 वर्षे रखडले, नागरिक वाहतूककोंडीने बेजार

सिडकोच्या गल थान कारभाराचा फटका उरण नगर परिषदेला बसला आहे. शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा उरण बायपास केवळ १२ कोटींच्या निधीअभावी २३ वर्षांपासून रखडला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे लोकसंख्या आणि वाहनांमध्ये वाढ झाल्याने उरणवासीय वाहतूककोंडीच्या बजबजपुरीने बेजार झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

उरण शहरातील वाहतूककोंडीचा ताण हलका करण्यासाठी कोटनाका ते बोरी-पाखाडी दरम्यान बायपास तयार करण्याची योजना उरण नगर परिषदेने २००२ मध्ये आखली होती. १२ मीटर रुंद ११५० मीटर लांबीच्या बायपासला लागणाऱ्या वन, महसूल, सिडको व संबंधित विभागाकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. दरम्यान २३ वर्षांपूर्वी या बायपासचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात होऊन ४०० मीटर लांबीचा रस्ता उभारण्यात आला. मात्र बायपासच्या कामासाठी लागणारी खासगी मालकीची ४ हजार २०० चौरस मीटर जागा संपादनासाठी १२ कोटींचा मोबदला देण्यासाठी महापालिका असमर्थ झाल्याने हे काम लटकले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला. मात्र सिडकोच्या तिजोरीत खडखडाट असल्याने १२ कोटींचा निधी अद्याप नगर परिषदेला मिळालेला नाही. भूसंपादनाचा मोबदला १५ भोगवटादारांना अदा करणे नगर परिषदेला शक्य झालेले नाही.

उरण बायपास रस्त्याचे काम तातडीने होणे गरजेचे आहे. रस्त्याच्या कामासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी १२ कोटी निधीची आवश्यकता आहे. निधीसाठी सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र सिडकोने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.
– निखिल ढोरे, सहाय्यक रचनाकार, उरण