रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थीनीवर बलात्कार करून रिक्षाचालक फरार, सीसीटिव्ही बंद; संतप्त जमावाचा रास्ता रोको

बदलापूर येथील घटना ताजी असतानाच रत्नागिरीत आणखी एका लाडक्या बहिणीवर बलात्कार झाला आहे. रत्नागिरी शहरात नर्सिंगच्या विद्यार्थीनीवर एका रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त रत्नागिरीकरांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर रस्ता रोको केला. पोलीस निरिक्षकांना घेराव घालत किती तास झाले, अजून आरोपी का सापडत नाही? असा प्रश्न उपस्थित करताना आरोपीला लवकर पकडा आणि आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली. दरम्यान लाखो रुपये खर्च करून शहरात लावलेले सीसीटिव्ही बंद असल्याची खळबळजनक बातमी पुढे आली आहे. सीसीटिव्ही बंद असल्यामुळे पोलीस आणि प्रशासन तोंडघशी पडले आहे.

नर्सिंगची ही 19 वर्षीय विद्यार्थीनी आज सकाळी सात वाजता साळवीस्टॉप येथे एका रिक्षात बसली. त्या तरुणीला शहराच्या दिशेने यायचे होते. पण त्या रिक्षाचालकाने दुसऱ्या दिशेला अजून दोन प्रवासी आहेत, ते घेतो असे म्हणून रिक्षा चंपक मैदानाच्या दिशेने फिरवली. त्यानंतर त्या रिक्षाचालकाने तिला पाणी प्यायला दिले. ती बेशुध्द पडल्यावर तिला चंपक मैदान येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

चंपक मैदानाजवळ बेशुध्द पडलेल्या तरुणीला काही वेळानंतर शुध्द आली. तिने आपल्या बहिणीला फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. तिच्या बहिणीने ही घटना पोलिसांना कळवली. पोलीसांनी तिला वैद्यकिय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. रत्नागिरीत बलात्कार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. रत्नागिरीतील नागरिक आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. खूप वेळ झाल्यानंतरही पोलिसांकडून कोणती माहिती मिळत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले.

पोलीस निरिक्षकांना घेराव

घटना घडून पाच-सहा तास उलटले तरी आरोपी अजून सापडला नव्हता. त्यामुळे नागरिक संतापले. त्यांनी शहर पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांना घेराव घातला. आरोपी अजून का सापडत नाही? सीसीटिव्ही कॅमेरे सुरु आहेत की नाहीत? रत्नागिरीसारख्या छोट्या शहरात तुम्हाला एक रिक्षाचालक आरोपी शोधायला किती वेळ लागतो? असे सवाल उपस्थित करताना आरोपीला आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्याला ठेचून काढतो, असा इशाराही नागरीकांनी दिला.

संतप्त परिचारिकांची निदर्शने

घटना घडल्यानंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि आरोग्य विभागातील कर्मचारी रस्त्यावर उतरले. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर येऊन निदर्शने केली. आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आंदोलनाची दिशा पुढील दोन दिवसात ठरवण्याचा निर्णय यावेळी कर्मचाऱ्यांनी घेतला.

संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

सायंकाळचे पाच वाजले तरी आरोपीचे धागेदोरेही पोलिसांना सापडत नसल्यामुळे रत्नागिरीकरांनी जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर येऊन रास्ता रोको केला. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांची समजूत काढली. आरोपीला लवकरच पकडू असे आश्वासन दिले. आरोपीला दोन दिवसात पकडू असे आश्वासन पोलिसांनी देताच जमाव संतापला. त्यानंतर पोलिसांनी 24 तासात आरोपीला पकडू असे सांगत नागरिकांची समजूत काढली.

लाखो रुपये खर्च केलेले सीसीटीव्ही ‘शो पीस’

जिल्हा नियोजनमधून लाखो रुपये खर्च करुन रत्नागिरी शहरात सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. त्यावेळी सीसीटीव्ही बसवले म्हणून गाजावाजाही करण्यात आला होता. मात्र साळवीस्टॉप येथील सीसीटीव्ही बंद असल्याची गंभीर आणि खळबळजनक माहिती पुढे आली आहे. लाखो रुपये खर्च केलेले सीसीटीव्ही शोपीस ठरले आहेत. त्यामुळे रत्नागिरीकरांची सुरक्षा आता रामभरोसे आहे. सीसीटीव्ही बंद असल्याचे कळताच नागरिकांनी संताप व्यक्त करताना पोलीस आणि प्रशासनाच्या कामकाजाचा पंचनामा केला.

‘त्या’ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करा, आमदार राजन साळवींची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन पिडीतेच्या आईवडीलांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार राजन साळवी म्हणाले की, साळवीस्टॉप येथील सीसीटीव्ही बंद आहेत ही शोकांतिका आहे. सीसीटीव्ही सुरु असते तर दोन तासात आरोपी सापडला असता. जिल्हा नियोजनमधून आम्ही लाखो रुपये सीसीटीव्हीसाठी देतो. त्याचा उपयोग तरी काय? असा संतप्त सवाल उपस्थित करताना सीसीटीव्ही बंद पडायला किंवा त्याची देखरेख न करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि नगरपरिषद प्रशासन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आमदार राजन साळवी यांनी शहर पोलीस निरिक्षक महेश तोरस्कर यांना सीसीटीव्ही का बंद आहेत? असा जाब विचारला. त्या आरोपीला ठेचून काढले पाहिजे असे संतप्त उद्गार त्यांनी काढले. यावेळी त्यांच्यासोबत सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जि.प.चे माजी उपाध्यक्ष उदय बने, संतोष थेराडे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, महिला शहर संघटक मनिषा बामणे आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.