वर्षभरात 6 विमानांचे इंजिन बंद पडले, नागरी उड्डाण मंत्रालयाची धक्कादायक माहिती

अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान कोसळून झालेल्या अपघातात तब्बल 242 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना उघडकीस येत आहेत. आता गेल्या वर्षभरात एकूण 6 विमानांचे इंजिन बंद पडल्याच्या आणि 3 मे डे कॉलद्वारे आपत्कालीन लँडिंगच्या घटना घडल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालातील आकडेवारीवरून समोर आली आहे. अहवालातील आकडेवारी नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज राज्यसभेत सादर केली.

इंडिगो आणि स्पाईसजेट कंपनीच्या विमानांच्या प्रत्येकी 2 तर एअर इंडिया आणि एअर अलायन्सची प्रत्येकी एक घटना इंजिन बंद पडल्याची होती, अशी माहिती मोहोळ यांनी दिली. तर अहमदाबादहून लंडनला उड्डाण केल्यानंतर दुर्घटनाग्रस्त झालेले एअर इंडियाचे विमान, इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमानातून प्रत्येकी एक मे डे कॉलची घटना घडल्याचे ते म्हणाले.

तीन वेळा दिला जातो मे डे कॉल

वैमानिकाद्वारे मे डे कॉल तीन वेळा दिला जातो. विमानाची जीवघेण्या स्थितीतील माहिती नियंत्रण कक्षाला मिळावी यासाठी हा कॉल दिला जातो, जेणेकरून वैमानिकाला मदत मिळू शकेल, असे नागरी उड्डाण राज्यमंत्री म्हणाले.

वर्षभरात लष्करी अधिकाऱ्यासह 48 प्रवाशांना उड्डाणावर बंदी

वर्षभरात 30 जुलैपर्यंत स्पाईसजेटच्या कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यासह एकूण 48 प्रवाशांना विमान उड्डाणावर बंदी घालण्यात आल्याची माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत दिली. 2023 आणि 2024 मध्ये अनुक्रमे 110 आणि 82 तर 2020 आणि 2021 मध्ये अनुक्रमे 10 आणि 66 विमान प्रवाशांवर उड्डाणासाठी बंदी घालण्यात आल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

एअर इंडिया दुर्घटनेची चौकशी सुरूच

अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानप्रकरणी चौकशी अहवाल 12 जुलै रोजी सादर करण्यात आला होता; परंतु या अहवालातून कोणताही निष्कर्ष निघू शकला नाही. त्यामुळे दुर्घटनेची चौकशी अद्याप सुरूच आहे, असे मोहोळ यांनी अन्य एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले. तपास अहवालाशी छेडछाड करण्यात आली आहे का, या प्रश्नावर प्रत्येक गोष्टीचा बारकाईने तपास केला जात असल्याचे ते म्हणाले.