ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या नर्सेसना ॲम्ब्युलन्स कोंबून आणले!

1909

‘कोरोना’च्या दहशतीमुळे अंतर ठेवून सार्वजनिक ठिकाणी वागा असे आवाहन एकीकडे करण्यात येत असतानाच ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील नर्सेसना रोज ॲम्ब्युलन्स मधून अक्षरशः कोंबून आणले जात आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून नर्सेसना घरून आणण्यासाठी व त्यांना पुन्हा घरी सोडण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच त्यांना आवश्यक त्या सुरक्षेच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

ठाण्याचे सिव्हील हॉस्पिटल म्हणजे गोर गरीब रुग्णांसाठी उपचाराचे महत्त्वाचे ठिकाण आहे. या रुग्णालयात काम करणारे नर्सेस तसेच कर्मचारी हे कसारा, शहापूर, बदलापूर, मुरबाड, कल्याण,भिवंडी ,पनवेल आदी विविध ठिकाणांहून येत असतात. या कर्मचाऱ्यांना रोज येणे सध्याच्या परिस्थितीत सक्तीचे करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी जीवावर उदार होऊन हे कर्मचारी रोज आपल्या घरातून निघतात. मात्र त्यांना कोणतेही स्वतंत्र वाहन उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी येत आहेत.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नर्सेसना येण्यासाठी तसेच त्यांना घरी सोडण्याकरिता चक्क ॲम्बुलन्सचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. या ॲम्ब्युलन्समध्ये नर्सेस व कर्मचाऱ्यांना अक्षरशः कोंबून प्रवास करावा लागतो. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने सुरू असतानाच त्यांना कोंबडीच्या खुराडा प्रमाणे आणले जात असल्याने त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरात लवकर अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या नर्सेस व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या