मंडप खड्ड्यांच्या 15 हजार दंडावरून पालिका आणि सरकारमध्ये जुंपली! प्रशासन म्हणते, दंड घेणारच; सरकार म्हणते, कमी करणार

गणेशोत्सवासाठी उभारल्या जाणाऱ्या मंडपामुळे खड्डा पडल्यास प्रत्येक खड्डय़ासाठी 15 हजार रुपये दंड वसूल करण्यावर पालिका प्रशासन ठाम असताना सरकारकडून मात्र दंड कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे कॅबिनेटट मंत्री आणि पालक मंत्री स्वतः मुख्यालयातील कार्यालयात ठाण मांडून बसलेले असतानाही पालिका आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले असून पालिका नक्की चालवतेय तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेचा कारभार आपल्याच माध्यमातून चालावा यासाठी सरकारने पालकमंत्र्यांचे ऑफिसच मुख्यालयाच्या इमारतीत थाटले आहे. मात्र प्रशासनासोबत समन्वय नसल्याचे समोर आले आहे.

सरकार म्हणते…

मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ वॉर्ड कार्यालयात आज कॅबिनेटट मंत्री आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जनता दरबार घेतला. या जनता दरबारात बोलताना मंत्री लोढा यांनी मंडप खड्डय़ासाठी जाहीर करण्यात आलेला 15 हजारांचा दंड कमी करण्यासाठी आयुक्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सव आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि जल्लोषाचा सण आहे. अशा उत्सवामध्ये भरमसाट दंडाविरोधात मंडळांची भावना आम्ही जाणतो. त्यामुळे याबाबत तोडगा काढू, असे मंत्री मंगलप्रभाल लोढा म्हणाले.