
बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधील बिगरआदिवासी अतिक्रमणांवर कारवाई करण्यास गेलेले वन खात्याचे पथक आणि पोलिसांवर आंदोलकांनी दगडफेक केल्याने प्रचंड तणाव निर्माण झाल्याची घटना घडली. यावेळी आदिवासींनी तीव्र निदर्शने करीत कारवाईला विरोध केला. यामुळे आदिवासी आणि पोलिसांमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला.
नॅशनल पार्कमधील बिगरआदिवासी जमिनीवर असणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोटीस बजावल्याची माहिती वन खात्याकडून देण्यात आली. यानुसार सोमवारपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे, मात्र या कारवाईला स्थानिकांकडून जोरदार विरोध केला जात आहे. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कारवाईला विरोध करणाऱ्या आंदोलकांना थोपवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांवरच हल्ला केल्याने पोलिसांनीही लाठीचार्ज करीत कारवाई केली. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले. त्यामुळे या कारवाईदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, जखमी आंदोलकांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या आंदोलनात दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर आंदोलन चिघळल्याने आज नॅशनल पार्क बंद ठेवून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
शिवसेनेमुळे स्थगिती
आदिवासी बांधवांची घरे तोडण्याच्या कारवाईची दखल घेत शिवसेनेच्या वतीने वनमंत्री गणेश नाईक यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली. यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली.
– आदिवासी वर्षानुवर्षे या ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार या रहिवाशांचे पुनर्वसन करणे अनिवार्य आहे. शिवाय उद्यानातील जागेवर असणाऱ्या काही रहिवाशांनी स्वेच्छेने पर्यायी जागी स्थलांतर केले आहे. शिवाय सर्व घरांवर शासनाने घर क्रमांक दिलेले आहेत. त्यानुसार कारवाई थांबवून घराच्या बदल्यात घर द्यावे. अॅड. जनरल यांनी उच्च न्यायालयात केलेल्या निवेदनानुसार सदर घरांचे पुनर्वसन 44 एकर जागेत तत्काळ करण्यात येईल, यानुसार कार्यवाही करण्यात यावी. तर उर्वरित 46 एकर जागेबाबत नंतर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन देताना शिवसेना विभागप्रमुख उदेश पाटेकर, विधासभा निरीक्षक शशिकांत झोरे, स्थानिक नगरसेविका सारिका झोरे, नगरसेवक धरम काळे, अॅड. संदेश नारकर, महेश मोरे, प्रशांत वरठे, विनायक मराठे आदी उपस्थित होते.

























































