
कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यात एका शाळेच्या वसतिगृहात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका 9 वीतील विद्यार्थ्याने क्षुल्लक वादातून आपल्याच मित्रावर लोखंडी रॉडने भीषण हल्ला केला. रविवारच्या रात्री उशिरा घडलेल्या या थरारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर आरोपी विद्यार्थी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बेल्लारी येथील ‘गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल’मध्ये घडली. रात्रीचे जेवण झाल्यानंतर सर्व विद्यार्थी वसतिगृहात झोपलेले असताना आरोपीने अचानक लोखंडी रॉडने झोपलेल्या विद्यार्थ्यांवर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने अडवायला आलेल्या वसतिगृह कर्मचाऱ्यांवरही हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य सात जण जखमी झाले. या जखमींना तातडीने विजयनगर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी शाळेवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलावर चाकूने वार करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी शाळेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आरोपी विद्यार्थ्याला अमली पदार्थांचे व्यसन असावे, असा संशयही पालकांनी व्यक्त केला असून, एवढ्या कडक सुरक्षेत एखादा अल्पवयीन मुलगा कसा हल्ला कसा करू शकतो, असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.
या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शाळेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असलल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सध्या बेल्लारी पोलीस करत आहेत.




















































