क्लीन अप मार्शल्सना मिळणार तीन महिन्यांची मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत कचरा फेकणाऱ्यांवर आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यासाठी नेमलेल्या क्लीन अप मार्शलना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. यामध्ये 22 संस्थांपैकी 20 संस्थांना मुदतवाढ देण्यात येणार आहे. मात्र क्लीन अप मार्शल ‘वसुली-दादागिरी’ करीत असल्याचा आरोप नागरिकांसह सर्वपक्षीय नगरसेवक करीत असल्यामुळे या प्रस्तावावर स्थायी समितीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी क्लीन अप मार्शलच्या नेमणुका करण्यात आल्या. हे क्लीन अप मार्शल सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करतात. मात्र अनेक वेळा क्लीन अप मार्शल ‘वसुली-दादागिरी’ करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतो. त्यामुळे 2007 मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना बंद करण्यात आली होती. मात्र ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत मुंबईत सफाई सुरू असताना अशा क्लीन अप मार्शल्सची आवश्यकता पालिकेला प्रकर्षाने जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा या योजनेला मुदतवाढ देण्याचा विचार आहे.

यांना मुदतवाढ नाही
अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी क्लीन अप मार्शलच्या नेमणुका करण्यात आल्या. मात्र काही मार्शल्सबाबत आजही तक्रारी येत आहेत. त्यामुळे यापुढे मार्शल्सबाबत तक्रार आल्यास त्याची गंभीर दखल महापालिका घेणार आहे. संबंधित मार्शलची चौकशी करून त्याची सेवाच खंडित करण्यात येणार आहे असा इशारा महापालिकेने दिला होता. त्यानुसार ‘एल’ विभागातील मार्शल्सबाबत तक्रारी असल्याने त्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे, तर ‘बी’ विभागातील संस्थेने कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांना काम देण्यात आलेले नाही.

  • 9 डिसेंबर 2018 रोजी क्लीन अप मार्शल्सला दिलेली चार महिन्यांची मुदतवाढ संपली, मात्र नवीन संस्था मिळत नसल्याने जुन्याच संस्थेला मुदतवाढ मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी प्रशासनाने आणला आहे.