
कालच्या चमकदार विजयाने वन डे क्रिकेटमधलं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं. यशस्वीने वन डे क्रिकेटमध्ये त्याचं पहिलं शतक फटकावलं खरं, पण ते काहीसं चुकत-माकत, धाडत-पडत आणि प्रसंगी रोहितची ‘बोलणी’ खात! रोहितची काहीशी गमतीदार बोलणी कुलदीपनेही खालीच! स्वतः रोहितनेही छान फलंदाजी केली, पण त्याची शतकाची संधी मात्र हुकली. अर्थात, अप्रतिम फलंदाजी करून विराटने त्याची छाप सोडली. त्याचे सर्व चौकार अन् षटकार खणखणीत!
मुरली कार्तिकच्या साक्षीने वामहस्ते उडवलेला टॉस अखेर राहुलने जिंकला त्या क्षणापासून जी स्मितं विस्फारली ती अखेरपर्यंत कायम राहिली अन् हिंदुस्थानने सामन्याबरोबरच मालिकाही जिंकली. हा खुशनाद एवढा सुरेल होता की, आनंदी आनंद झाला असं खास कुणाला सांगण्याची गरजच राहिली नाही!
नादमयी नांदी झाली ती अर्शदीपच्या पहिल्याच षटकात. त्याने स्टम्पजवळून टाकलेला चेंडू रिकल्टनच्या बॅटची पप्पी घेऊन राहुलच्या हाती विसावला. त्यानंतर क्विंटन डिकॉकने तडाखेबाज शतक फटकावून आणि आपली चमक दाखवली. त्याचे पुल, ड्राईव्हज सुंदर होते. बल्लेबाजी करण्याची खुमखुमी कमी झालेली नाही हेच त्याने दाखवून दिलं! बव्हुमानेही त्याला छान साथ दिली, मात्र बव्हुमा ब्रिट्झके, ब्रेव्हिसची कश्मकश अपुरी पडली. भरवशाचे फलंदाज मार्व्रम-यान्सन अपेशी ठरले अन् आफ्रिकेचा संघ जणू शरपंजरीच पडला! महाराजचे यत्न तर पारच तोकडे! अर्थात, लागोपाठ दोन सामन्यांत साडेतीनशे धावा उधळणाऱ्या संघासाठी दोनशे सत्तरची धावसंख्या म्हणजे श्वास घेण्याएवढं सोप्पं ठरलं!
संध्याकाळी नियमित पडणारं दव किती महत्त्वाचं ठरतं, हे मात्र या सामन्याने अधोरेखित केलं. राहुलने टॉस जिंकून आफ्रिकेची धावसंख्या गाठायचं ठरवलं आणि आपल्या गोलंदाजांना जणू संजीवनीच मिळाली. सामन्यात चार बळी घेणारा कुलदीप टाकलेल्या प्रत्येक तिसऱ्या चेंडूवर फलंदाजाला बाद करील अशी उत्पंठा उगवून गेला! प्रसिधनेही चार बळी घेतले, पण पुन्हा धावांची खिरापत वाटली. फलंदाजाच्या शरीरापासून दूर चेंडू टाकला किंवा मागच्या पायावर रोवून फटका मारण्याची संधी मिळेल एवढा चेंडू आखूड टप्प्यावर पडला की फलंदाज खूश होतात. ती एक पर्वणीच ठरते! प्रसिधकडे वेग आहे, आता अर्शदीपकडून थोडं शहाणपण तेवढं घ्यायला हवं!
दोनच दिवसांत आता टी–ट्वेंटीचा झगमगाट सुरू होईल. पाच सामने आहेत अन् जोरजोरात ढोल वाजण्याची अपेक्षा आहे! त्याही मालिकेत आपल्याच वीरांचे सूर लागावेत ही इच्छा!


























































