टायर फुटले अन् धावत्या बसने घेतला पेट; गाढ झोपेत असलेल्या काँग्रेस आमदारासह 37 जण मृत्यूच्या दाढेतून परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. भुवनेश्वरहून नबरंगपूरकडे जाणाऱ्या एका खासगी बसचे टायर फुटले आणि बसने पेट घेतला. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये चित्रकोंडा मतदारसंघातील काँग्रेस आमदार मंगू खिल्ला यांच्यासह 37 प्रवासी प्रवास करत होते. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना जागे करत खाली उतरवले. यामुळे मोठी जीवितहानी टळली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रामभद्रपुरम जवळ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. बसमधील सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक बसचे मागील टायर फुटले. टायर फुटल्यामुळे झालेल्या घर्षणामुळे ठिणग्या उडून बसने पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.

बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने क्षणाचाही विलंब न लावता गाडी थांबवली. त्याने आरडाओरडा करून सर्व प्रवाशांना झोपेतून जागे केले आणि तातडीने बसच्या खिडक्या व दरवाजे उघडून सर्वांना बाहेर काढले. ‘ओडिशा ट्रॅव्हल्स’ची ही खासगी बस होती. या भीषण आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली असली, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही, अशी माहिती बोंबिली ग्रामीण पोलीस स्थानकाचे सीआय श्रीनिवास यांनी दिली.

आम्ही सर्वजण झोपेत होतो, पण बस चालकाच्या सतर्कतेमुळे आमचे प्राण वाचले. सर्व प्रवासी बाहेर पडल्यानंतर काही वेळातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, अशी माहिती काँग्रेस आमदार मंगू खिल्ला यांनी दिली. मंगू खिल्ला यांनी भुवनेश्वरमधील रसूलगड येथून ही बस पकडली होती.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. या आगीमध्ये प्रवाशांचे सामानही जळून खाक झाले असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. टायर फुटून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.