देवभूमी उत्तराखंडवर आभाळ कोसळलं; चमोलीमध्ये मध्यरात्री ढगफुटी, झोपेत असलेलं थराली गाव चिखलाखाली, एकाचा मृत्यू

देवभूमी उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा पावसाचा कहर सुरू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री चमोली जिल्ह्यातील थराली भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. यामुळे झोपेत असलेले गाव दगड-धोंडे आणि चिखलाखाली गेले असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि चिखलाखाली अनेक घरं दबली आहे. दुकानं, गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफच्या पथकांना घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू केले आहे.

मध्यरात्री सुरू झालेल्या अति मुसळधार पावसामुळे डोंगरावरून दगड, धोंडे चिखल थराली गावावर कोसळला. यात थराली बाजार, कोटदीप आणि तहसील परिसराचे मोठे नुकसान झाले. या भागातील अनेक सरकारी कार्यालय, घरांमध्ये पुराचे पाणी, चिखल घुसले. अनेक गाड्या चिखलाखाली दबल्या गेल्या आहे. रस्त्यांवरही चिखल झाला असून सागपाडा येथे चिखलामध्ये दबून एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. कविता असे तरुणाचे नाव आहे, असी माहिती एडीएण विवेक प्रकाश यांनी दिली.

ढगफुटीमुळे या भागामध्ये मोठे नुकसान झाले असून लोकांनी घराबाहेर सुरक्षित स्थळी धाव घेतली आहे. पोलीस, स्थानिक प्रशासन, एसडीआरएफचे पथक बचावकार्यात गुंतले असून दुकानं, घरं, सरकारी कार्यालयातील चिखल उपसण्याचे काम सुरू आहे. तसेच एक व्यक्ती बेपत्ता झाल्याचेही वृत्त असून त्याचाही शोध सुरू आहे.

मुसळधार पाऊस आणि चिखलामुळे थराली-ग्वालदम मार्ग मिंग्गदेरा येथे बंद झाला आहे. तसेच थराली-सागवाडा मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. जिल्हा प्रशासनाने थराली भागातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना शनिवारी सुट्टी जाहीर केली आहे. पोलीस आणि प्रशासनाची पथके मदत आणि बचावकार्यासाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. संदीप तिवारी यांनी दिली.