मराठा आंदोलन : कालबद्ध आणि योग्य वेळेत आरक्षण देणार- मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. प्रत्यक्ष कायदेशीर कार्यवाही आम्ही वेगाने पूर्ण करीत असून योग्य वेळेत आरक्षण देणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

मराठा समाजाने घेतलेली आक्रमक भूमिका आणि पसरलेले आत्महत्यांचे लोण यामुळे राज्य सरकारचे धाबे दणाणले आहे. यावर तोडगा निघावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मराठा समाजातील विचारवंत व मान्यवरांची बैठक बोलावली. मराठा समाजाला कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण लवकरात लवकर द्या, अशी मागणी या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

निमंत्रण पाठविण्यात आलेल्या ३० मान्यवरांपैकी २० ते २२ मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. या मान्यवरांमध्ये ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे, सदानंद मोरे, अभिनेते सयाजी शिंदे, अमोल कोल्हे, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, सुरेश हाकरे, अभिजित पकार, पोपटराक पकार, कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आदी मान्यकर उपस्थित होते. सरकारकडून मराठा समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमधील त्रुटी मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

७ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर मराठा आंदोलन पेटणार!

परळी वैजनाथ- ७ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा ९ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या वेळी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली उपसमिती रद्द करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच यापुढे रस्त्यावर आंदोलने होणार नाहीत, असेही जाहीर करण्यात आले.