काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कोंबडी विकण्याचा धंदा, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्ला

सामना ऑनलाईन । मुंबई

काँग्रेस गरिबी हटवू शकत नाही, उधारीचा वायदा आहे. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कोंबडी विकण्याचा धंदा असून सर्व आश्वासने खोटी आहेत. 55 वर्षांत काँग्रेसने अनाचार, भ्रष्टाचार, दुराचार यांची मालिका सुरू ठेवली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

उत्तर-पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ अंधेरी पूर्वेकडील सुभाषनगर येथे झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान, गजानन कीर्तिकरांसारखे नेतृत्व हवे असे सांगतानाच संसदेत प्रश्न विचारणाऱ्या देशातील पाच खासदारांमध्ये कीर्तिकरांचा समावेश असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी राज्यमंत्री रवींद्र वायकर, विद्या ठाकूर, विभागप्रमुख–आमदार ऍड. अनिल परब, अमित साटम, विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू, आमदार रमेश लटके, भारती लव्हेकर, रिपाइंचे प्रकाश जाधव, भाजपच्या सरिता राजपुरे, रासपचे मनीष पटेल आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

खोटे बोलून, तोंडाच्या वाफेने इंजिन चालत नसते
पूर्वी सायकल, मोटर भाडय़ाने घेतली जात होती, आता राष्ट्रवादी काँग्रेसने इंजिन भाडय़ाने घेतले आहे पण केवळ खोटे बोलून तोंडाच्या वाफेने इंजिन चालत नसते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. काळाचौकी येथे शहीद भगतसिंग मैदानावर महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी आज विजयी संकल्प सभा झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपनेत्या मीना कांबळी, माजी आमदार दगडू सकपाळ, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर व पांडुरंग सकपाळ, सूत्रसंचालक उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, भाजपचे नेते मधू चव्हाण, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, प्रवक्त्या शायना एन. सी., आमदार मंगलप्रभात लोढा, अतुल शहा, रिपाइंचे सिद्धार्थ गमरे, सोना कांबळे आदी उपस्थित होते.