
वाढत्या बेरोजगारीच्या समस्यांवरून राज्यातील विरोधक सत्ताधारी पक्षांना धारेवर धरतात. हे लक्षात घेता महाराष्ट्रात औद्योगिक विकास आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी युगांडास्थित प्रसिद्ध मॅन्युफॅक्चरिंग समूह ‘माधवानी-टर्नर ग्रुप’च्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतली. या बैठकीत पुढील पाच वर्षांसाठी राज्यातील गुंतवणुकीच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
माधवानी समूहाने अलीकडेच हिंदुस्थानातील सर्वात मोठी कंटेनर ग्लास उत्पादक कंपनी ‘हिंदुस्तान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्रीज लिमिटेड’ (HNGIL) चे अधिग्रहण केले आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत नाशिकमधील HNGIL चा प्लांट पुन्हा कार्यान्वित करण्याच्या मुद्द्यावर विशेष भर देण्यात आला. हा प्लांट सुरू झाल्यास नाशिक आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात वाढ होईल आणि रोजगाराचे नवे केंद्र निर्माण होईल.
गुंतवणुकीचे नियोजन आणि सहकार्य बैठकीत ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत राज्य सरकारचे सहकार्य, उद्योगांच्या गरजा आणि महाराष्ट्रातील ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ यावर चर्चा झाली. माधवानी समूहाचे अध्यक्ष श्राई माधवानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात मिहिर माधवानी, एमडी कुमार कृष्णन आणि सूरज मेहता यांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी या गुंतवणूक योजनांचे स्वागत करून राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.






























































