पूरस्थितीत राजकारण करू नका! उणिवा दाखवा; दुरुस्त करू- मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी, सांगली 

2005 पेक्षा या वर्षी तिप्पट पाऊस झाला. नऊ दिवसांत 758 टक्के पाऊस पडल्यामुळे सांगलीत पूरस्थिती निर्माण झाली. सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. पूर्ण पूर ओसरायला 72 तास लागतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. विरोधकांकडून आपत्कालीन परिस्थितीत राजकारण सुरू आहे. राजकारण करू नये. काही कमतरता, उणिवा असतील जर जरूर दाखवा, दुरुस्त केल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत माहिती दिली. सांगलीसाठी कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येईल. पूर ओसरल्यानंतर पाणीपुरवठा, विद्युत यंत्रणा, स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल असे मुख्यंमत्र्यांनी सांगितले.

विरोधक आपत्कालिन परिस्थितीत राजकारण करत आहेत. काही कमतरता असेल ती दाखवावी पण राजकारण करू नये. सध्या ग्राऊंडलेव्हलला राजकारण सुरू आहे. लोक पुरातून बाहेर येऊ देत मग राजकारण करू पण आता लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढणे आवश्यक आहे. त्यामुळे विरोधकांनी राजकारण करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.

जिल्हा यंत्रणेचीही चौकशी करणार

महापुरामुळे ब्रम्हनाळ येथे बोट उलटून दहा जणांना मृत्यू झाला. ही घटना दुर्दैवी आहे. मात्र या घटनेची चौकशी केली जाणार आहे. तहसीलदार असो किंवा अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. शिवाय पूर परिस्थितीचे गांभीर्य प्रशासकीय यंत्रणेने घेतले होते का? उपायोजना योग्य प्रकारे केल्या की नाहीत? यासाठी जिल्हा यंत्रणेची चौकशी देखील केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

कर्नाटक व महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय

अलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक विसर्ग करावा, अशी विनंती आम्ही कर्नाटक सरकारकडे केली होती. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी देखील बोलणे झाले होते. मात्र चार लाखांवर विसर्ग झाल्यानंतर कर्नाटकातील 129 गावांना पुराचा धोका निर्माण होतो. कर्नाटक सरकारने सध्या अलमट्टीतून 5 लाख 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. दोन्ही राज्य पूर्णपणे एकमेकांना मदत करत आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले

कोयनामध्ये 100 टीएमसी पाणी असते, 9 दिवसांत 50 टीएमसी पाणी भरले गेले आहे. त्यामुळे विसर्ग मोठय़ा  प्रमाणात झाला.
कृष्णा, पंचगंगा, कोयना अशा एकत्रित विसर्गामुळे ही परिस्थिती
ओरिसा, पंजाब, गुजरात, गोवा अशा अनेक राज्यातून टीम बोलावल्या. आज नौदलाच्या 15 चमू विशाखापट्टणम येथून येत आहेत.
सांगलीत सुमारे 95 बोटी कार्यरत. एनडीफारएफ, नौदल, लष्कर, कोस्टगार्डच्या जवानांकडून बचाव कार्य वेगाने सुरू आहे.
सांगलीत 101 गावांतील 1 लाख 43 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.
35 हजार जनावरंसुद्धा विविध शिबिरांमध्ये ब्रम्हनाळच्या घटनेत 12 जणांचा मृत्यू, 8 बेपत्ता, 2 जखमी. याव्यतिरिक्त कुठेही जिवितहानीचे वृत्त नाही.
नजरपाहणीनुसार, 27468 हेक्टर जमीन बाधित. पाणी ओसरल्यावर नेमकी माहिती हाती येईल.
484 कि.मी.चे रस्ते बाधित
2615 रोहित्र अंशतः वा पूर्णतः नुकसान, कमतरता नाही. कमीत कमी वेळात पूर्ववत करणार. पुर ओसरल्यानंतर जादा यंत्रणा लावून वीज पुरवठा सुरळीत केला जाईल.
7 टन अन्नधान्य, पाणी कालपर्यंत पोहोचविण्यात आले. आता बोटीने सुद्धा अन्नधान्य पोहोचविण्यात येत आहे.  काही लोक बाहेर निघायला तयार नाहीत, त्यांनाही विनंती करण्यात येत आहे.
ज्यांना रोखीने मदत देण्याची गरज आहे, त्यांना रोखीने मदत देण्याचा निर्णय कालच घेण्यात आला असून, तसे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. रोखीने मदत दिल्यास कॅग आक्षेप घेते. पण, अशा प्रसंगात कॅगचे आक्षेप सुद्धा सहन केले पाहिजे.
जनावरांचे नुकसान – 30 हजार रूपये मदत
दोन्ही जिह्यात प्रत्येकी 100 डॉक्टरांच्या चमू तैनात करण्यात आल्या आहेत.  शेतीतील गाळ काढण्यासाठी 13000 रुपये हेक्टरी मदत, खरडून गेलेल्या जमीनीसाठी 38000 रूपये मदत