
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुधवारी जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे त्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकर्यांनी अपर तहसील कार्यालयासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा हातात घेत मुख्यमंत्री ’गो बॅक… गो बॅक…’ अशा घोषणा देण्यात आल्या.
हिंगोली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. कधी कोरड्या दुष्काळाने तर कधी अवकाळीने शेतकर्यांचे मोठे नुकसान केले आहे. राज्यातील सरकारकडे अतिवृष्टी व अवकाळीच्या विम्यासाठी वारंवार मागणी करुनही सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. गोरेगाव येथील 10 शेतकर्यांनी बँकेचे कर्ज फेडण्यासाठी आपले अवयव विक्रीला काढले होते. मात्र, अवयव कुणी घेण्यासाठी तयार नसल्याने शेतकर्यांनी सरकारलाच अवयव खरेदी करावे व आमचे कर्ज माफ करावे, अशी मागणी केली. मात्र, सरकारकडून शेतकर्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेतकर्यांनी गोरेगाव अपर तहसील कार्यालयासमोर सरकारचे श्राद्ध घातले. सरकारकडून शेतकर्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे गोरेगाव ग्रामस्थांनी चक्क गावच विकायला काढले. शेतजमिनी व गुरा-ढोरांसह गाव विकत घ्या आणि आमचे कर्ज माफ करा, अशी मागणी देखील शेतकर्यांनी केली. आज बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आखाडा बाळापूर येथे येण्याअगोदरच गोरेगाव अपर तहसील कार्यालयासमोर शेतकर्यांनी मुख्यमंत्री ’गो बॅक… गो बॅक…’ अशा घोषणा दिल्या. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी गोरेगाव पोलिसांनी शेतकर्यांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर सोडून दिले. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याअगोदरच शेतकर्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा हातात घेऊन मुख्यमंत्री ’गो बॅक… गो बॅक…’च्या घोषणांनी लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दशरथ मुळे, पांडुरंग कावरखे, विजय कावरखे, कुसूम कावरखे, राहुल कावरखे, मधुकर कावरखे, सुभाष कावरखे, विठ्ठल खिल्लारी, गंगाराम मस्के, पंढरी कावरखे, नामदेव कावरखे, बबनराव कावरखे, रामेश्वर कावरखे आदी शेतकर्यांचा सहभाग होता.
























































