मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून

238
file photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा येत्या 21 ऑगस्टपासून सुरू होईल. दुसर्‍या टप्प्यातील ही यात्रा दहा दिवस चालणार आहे. ही यात्रा 14 जिल्ह्यांतील 55 मतदारसंघांतून जाईल.

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा मागील आठवड्यात स्थगित केली होती. आता पूरस्थिती ओसल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा एकदा महाजनादेश यात्रेवर जाणार आहेत. येत्या 21 ऑगस्टला नंदुरबारमधून दुसर्‍या टप्प्यातील यात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, नगर आदी मार्गाने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत जाईल.

काँग्रेसची मागणी हेक्टरी 60 हजारांची

राज्यातील पूरग्रस्तांना भरीव आर्थिक मदतीसह शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी तसेच हेक्टरी 60 हजार रुपये मदत करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ही मागणी करण्यात आली. राज्याच्या अनेक जिल्ह्यांत पुराने थैमान घातले असताना दुसरीकडे मराठवाड्यात पाऊस नसल्याने दुष्काळाची स्थिती कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळी मदत जाहीर करावी, अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसच्या इतर पदाधिकार्‍यांचा समावेश होता. काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सुमारे 11 मागण्यांचे निवेदन दिले.

भालके तुम्ही आहात कुठे? – थोरात

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा काँग्रेसचे आमदार भारत भालके ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर होते, पण भारत भालके काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही बाब नेमकी हेरली आणि प्रसिध्दी माध्यमांच्या समक्षच आमदार भालके यांना आहात कुठे? हल्ली दिसत नाही, असा खोचक प्रश्न थोरात यांनी विचारला त्यावर भालके यांनी थेट उत्तर दिले नाही. पण प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी असल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्र्याकडे वैयक्तिक स्वरूपाचे काम असल्याने आल्याचे सांगत काढता पाय घेतला. काँग्रेसचे आमदार भारत भालके हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे थोरात यांनी केलेल्या प्रश्नाकडे प्रसिद्धीमाध्यमांचे लक्ष वेधले गेले.

आपली प्रतिक्रिया द्या