धाराशीव दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना भेटला संवेदनशीलतेचा ‘आदर्श’, चिमुकल्याने खाऊचे पैसे दिले मुख्यमंत्री सहायता निधीसाठी

‘आदर्श तू दिलेली ही प्रेमाची भेट आहे. यात या रक्कमेइतकीच भर घालून, ती मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात येईल,’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शब्दांनी आदर्श जाधव या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आनंद चमकला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरूवारी धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात आदर्श जाधवने खाऊसाठी जमा केलेल्या रक्कमेचा डबा मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे सोपविला. त्यावेळी त्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी हा संवाद झाला.

आदर्श सौदागर जाधव हा मंगळूर (ता. तुळजापूर) येथील चिमुकला. घरच्यांनी खाऊसाठी दिलेले पैसे त्याने एका डब्ब्यात साठवले होते. हे पैसे त्याने वडील सौदागर जाधव यांच्यासोबत जाऊन धाराशीव दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे सुपूर्द केले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चिमुकल्या आदर्शची आस्थेवाईक विचारपूसही केली. ‘तू दिलेली ही प्रेमाची भेट आहे. यात या रक्कमेइतकीच भर घालून, ती मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात येईल,’असे सांगतानाच आपत्कालीन परिस्थितीतही धीराने आणि परस्परांना सहाय्य करण्याच्या चिमुकल्या आदर्शच्या संवेदनशीलतेचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले.

आपली प्रतिक्रिया द्या