महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रात एकजूट दाखवा, मुख्यमंत्र्यांचे सर्वपक्षीय खासदारांना आवाहन

997

महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून खासदारांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे मांडावेत. राज्याच्या विकासाशी निगडीत सर्वच मुद्यांवर महाराष्ट्राची एकजूट दाखवावी. महाराष्ट्राचं कुटुंब म्हणून खासदारांनी दिल्लीत काम करावं आणि राज्यातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यावा. एकजुटीने आवाज उठविला तरच प्रश्न सोविले जातील, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘जनतेने ज्या कामांसाठी निवडून दिले आहे ते पूर्ण झालेच पाहिजे,’ अशी अपेक्षा सर्वपक्षीय खासदारांकडे व्यक्त केली.

महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हेही या बैठकीला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्याने केंद्र सरकारकडे मागितलेल्या अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या निधीसह विविध प्रश्नांचा आढावा घेतला. सीमा प्रश्न, परवडणाऱ्या घरांची निर्मिती, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करणे, 21 नद्यांचे पुनरुज्जीवन तसेच संवर्धन अशा अनेक प्रश्नांबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिल्या.

सीमा प्रश्नाबाबत सर्वपक्षीयांनी एक व्हा!

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत तिथल्या बांधवाच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे हे दाखवून देण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी एकजूट दाखवावी, असे वाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं पत्र केंद्र शासनाकडे पाठविलं आहे. त्याचा एकत्रित पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.

राज्याच्या प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा होण्यासाठी सर्वपक्षीय समिती असावी अशी सूचना खासदार शरद पवार यांनी यावेळी मांडली. यानुसार केंद्र शासनाच्या विविध विभागांकडे राज्याच्या प्रलंबित प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा करण्यासाठी खासदारांची समिती गठीत करून तिच्या समन्वयकपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

महाराष्ट्राचे प्रश्न संसदेत मांडताना विषयानुरूप टीम तयार करा. त्यात पक्षीय भेदाभेदाला थारा देऊ नका. ज्याकेळी महाराष्ट्रातील विषयांवर खासदार संसदेत विचार मांडणार असतील त्यावेळी सर्व खासदारांनी आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे, असे सांगतानाच पुढील महिन्यात दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये खासदारांची बैठक घेऊन प्रश्न सुटले की नाहीत याचा आढावा घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

परवडणाऱ्या घरांसाठी केंद्राच्या जागा मोकळय़ा करा

मुंबईमध्ये रेल्वे, केंद्र शासनाशी संबंधित विभागाच्या मोकळ्या जागा आहेत. त्या परवडणारी घरे बांधण्याकरिता द्याव्यात यासाठी प्रयत्न करण्याचे आकाहनदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी केंद्र शासनाकडे प्रलंबित असून राज्याला हा निधी प्राधान्याने मिळावा यासाठी खासदारांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी सर्वच खासदारांनी आपल्या भागातील विविध प्रलंबित मुद्यांबाबत माहिती देतांना राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर एकत्रित पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्य सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, दादा भुसे, नवाब मलिक, अस्लम शेख, आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. त्याचप्रमाणे बैठकीस विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या