शुभेच्छांचा वर्षाव! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध आरोग्यविषयक उपक्रम

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्वसामान्य जनतेपासून मान्यवर नेत्यांपर्यंत सर्वांनीच शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आरोग्यासाठी अभीष्टचिंतन केले. शिवसैनिकांनी आपल्या लाडक्या नेतृत्वाचे अभीष्टचिंतन करतानाच फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लाख लाख शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. दरवर्षी आपल्या या लाडक्या नेत्याला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल होतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसैनिकांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम हाती घेतलेच, शिवाय फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

संयमी, कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू नेतृत्व; शरद पवार यांच्यासह मान्यवरांच्या शुभेच्छा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा खास फोटो शेअर करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त अभीष्टचिंतन करताना राज्याच्या हितासाठी आपल्या संयत, कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू नेतृत्वाद्वारे त्यांनी उत्तम कार्य करीत राहावे या शुभेच्छांसह दीर्घायु आणि सुयश चिंतितो, अशा शुभेच्छा शरद पवार यांनी ट्विटरद्वारे दिल्या. या शुभेच्छांचा स्वीकार करताना उद्धव ठाकरे यांनीही आपले मार्गदर्शन आणि आशीर्वाद पाठीशी असू द्यात, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फोनद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन केले. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, आमदार सचिन पायलट, विप्लव कुमार देव, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार हेमा मालिनी, भाजपनेते आशिष शेलार, पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, माजी खासदार आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेनेच्या महिला आघाडीच्या वतीने मध्य रेल्वेच्या कल्याण रुग्णालयातील 250 महिला कर्मचाऱ्यांना महिला कार्याध्यक्षा स्मिता अवसरमल यांच्या नेतृत्वाखाली मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षेच्या इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले. रेल कामगार सेनेच्या सचिव मंजुषा माटे यांनी स्वखर्चाने या वस्तू बनवल्या.

शिवसेना शाखा क्रमांक 166 मध्ये सोमवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी आरोग्य सेवकांनी रहिवाशांचे ऑक्सिमीटर प्लसने रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तसेच थर्मल गनने शरीराचे तापमान तपासले. विभागप्रमुख, आमदार संजय पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख राजन खैरनार यांनी शिबिराचे आयोजन केले.

आरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान

त्याचप्रमाणे शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी न जमता आरोग्य शिबिरे, रक्तदान तसेच प्लाझ्मादान शिबिरे घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शिवसैनिकांनी हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करीत ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली. त्याचप्रमाणे रक्तदान आणि प्लाझ्मादान शिबिरांच्या माध्यमातून कोरोना तसेच अन्य रुग्णांना दिलासा दिला.

पंतप्रधानांकडून शुभेच्छा!

वाढदिवस हा गतकाळातील स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो. त्याचबरोबर भविष्याची रूपरेषा ठरविण्याची एक संधी निश्चित करण्याचा हा दिवस असतो. मला विश्वास आहे की, आजचा दिवस राज्य आणि देशाच्या विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल, अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या