
जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल महाराष्ट्राला अभिमान आहे. डिसले यांच्यासारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहचविणार, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या कामगिरीबद्दल त्यांना गौरविले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, डिसले यांना हा पुरस्कार मिळाला नसून त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामाने हा पुरस्कार मिळविला आहे. यावरच ते थांबले नसून त्यांनी पुरस्काराची रक्कम या स्पर्धेतील इतर नऊ स्पर्धकांमध्ये वाटून दिली आहे. त्यांनी केलेले कार्य हे ध्येयवेडाचे उदाहरण आहे. डिसले यांची शिक्षणक्षेत्रात काम करण्याची तळमळ यातून दिसून येते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
डिसले यांची मदत घेऊन शिक्षण विभागाने काम करावे
कोविडनंतर शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मुंबई महापालिकेतील शाळांमधून व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना राबविली गेली होती, याच धर्तीवर कोविडनंतरचे शिक्षण राज्यातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी डिसले यांच्यासारख्या तंत्रज्ञानस्नेही आणि नाविन्यपूर्ण विचार करणाऱया शिक्षकांची मदत घेऊन शिक्षण विभागाने काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांचे उत्तम काम
सोलापूरसारख्या दुष्काळी समजल्या जाणाऱया भागातील जिल्हा परिषदेतील शिक्षकाने हा पुरस्कार मिळविला ही खरच अभिनंदनीय बाब आहे. या शाळांमधील काम उत्तम आहे याचा दाखला या पुरस्काराच्या रुपाने मिळाला आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जात असून आता इंग्रजी शाळांबरोबर स्पर्धा करणाऱया शाळा म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा ओळखल्या जात आहेत, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले सरांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राचे नाव देशातच नव्हे तर साऱया जगभर पोहचविणाऱया रणजितसिंह डिसले सरांच्या कार्याचा अभिमान वाटतो असे गौरवोद्गार काढले.


























































