मुंबईच्या विकासात महापालिकेचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

708

मुंबईच्या विकासात आणि प्रगतीत मुंबई महानगरपालिकेचे मोलाचे योगदान असून, याचे श्रेय महानगर पालिकेच्या अधिकारी कर्मचार्‍यांना जाते असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. मुंबई महापालिका निर्मित वाईल्ड लाईफ मुंबई चित्रफीतीचा शुभारंभ व वीरमाता जिजाबाई उद्यानातील निसर्ग माहिती केंद्राचे सादरीकरण दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

मुंबई शहराच्या विकासासाठी आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, महापौर किशोरी पेडणेकर नवनवीन प्रयोग राबवीत आहेत. मुंबईचे वैभव जगात पोहचविण्यासाठी ते प्रयत्न करीत असून त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. वाईल्ड लाईफ मुंबई या चित्रफितीत मुंबईचा नैसर्गिक वारसा दाखवण्यात आला असून, आजच्या पिढीला तो प्रेरणादायी ठरेल असा विश्वास  मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त  केला.

पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आपल्या मनोगतात म्हणाले, मुंबईमध्ये महापालिकेचे काम उत्कृष्ट असून मुंबईत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाईल्ड लाईफ मुंबई चित्रफीतीचा शुभारंभ झाल्यानंतर आयोजकांसोबत चित्रफित बघितली. कार्यक्रमात वीरमाता जिजाबाई उद्यानातील निसर्ग माहिती केंद्राचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाला मुख्यमंत्री यांच्या समवेत पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या