साथरोगांवर उपचारासाठी राज्यात ठिकठिकाणी कायमस्वरूपी रुग्णालये उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

652

नागरिकांचे सुदृढ आरोग्य हा राज्य शासनाच्या दृष्टीने प्राधान्याचा विषय असून राज्यातील प्रत्येक नागरिक सुदृढ, निरोगी राहावा यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनासारख्या साथरोग आजारांवर उपचारासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी कायमस्वरूपी रुग्णालये उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सांगितले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व मिरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्व येथे कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी उभारलेल्या दोन स्वतंत्र अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्‍ह‍िड‍िओ कॉन्‍फरन्‍सद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. क्वॉरंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रेसिंग, ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. सर्व यंत्रणांनी मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. कोरोना रुग्णांवर उपचारादरम्यान अतिशय काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. योग्य औषधोपचाराबरोबरच रुग्णाची योग्य काळजी व रुग्णसेवा अत्यंत महत्त्वाची असून यामध्ये हयगय अथवा दुर्लक्ष होता कामा नये. या बाबींवरही स्थानिक प्रशासनाने लक्ष केंद्रित केल्यास मृत्यूदर कमी करणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मिरा-भाईंदर महानगरपालिका परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी या आरोग्य केंद्रांची मदत होणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार भाईंदर येथे व कल्याण डोंबिवली येथे तातडीने समर्पित कोविड आरोग्य केंद्रांच्या उभारण्याचे काम सुरू करण्याचे निर्देश म्हाडाला दिले. कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचवणे व त्यांना तातडीने औषधोपचार मिळावेत, या उद्देशाने या आरोग्य केंद्रांची उभारणी करण्यात आली असून या उभारणीत ‘म्हाडा’ने दिलेले योगदान मोलाचे असून कौतुकास्पद आहे.

भाईंदर पूर्व येथील स्व. प्रमोद महाजन सभागृह, गोपाळ पाटील रोड येथे अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. 7 हजार 980 चौरस फूट जागेमध्ये उभारलेल्या या आरोग्य केंद्रात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी एकूण 206 बेड आहेत. हे सर्व बेड ऑक्सिजन सुविधा असलेले आहेत. या केंद्रात नोंदणी, बाह्यरुग्ण व अतिदक्षता विभाग तयार करण्यात आले असून अतिदक्षता विभागात दोन व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सहा किलोलिटर साठवण क्षमता असणारी ऑक्सीजन टाकी बसवण्यात आली आहे. भाईंदर पूर्व (जि. ठाणे) येथील स्व. मीनाताई ठाकरे मंडई येथे उभारण्यात आलेल्या दुसऱ्या समर्पित कोविड आरोग्य केंद्रात (DCHC) कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी एकूण 165 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व बेड ऑक्सिजन सुविधा असलेले आहेत. याही आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सहा किलोलिटर साठवण क्षमतेची ऑक्सिजन टाकी उभारण्यात आली आहे.

या दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय तज्ञ व कर्मचारी 24 तास कार्यरत राहणार आहेत. तसेच विविध चाचण्यांसाठी पॅथॉलॉजी लॅबही उभारण्यात आली आहे. केंद्रात रुग्णांसाठी खानपानाची सुविधा असणार आहे. तसेच रुग्णांसाठी स्वतंत्र शौचालय व स्नानगृह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आमदार रवींद्र फाटक, आमदार रवींद्र चव्हाण, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, आयुक्त विजय राठोड आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या