पोलिसांसाठी सर्व काही करू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

पोलीसही माणूस आहे आणि त्यांनाही घरं आहेत, त्यांच्यासाठी आम्ही काम करतोय. तुमच्याकडे काही योजना असतील तर घेऊन या नक्की त्यावर कार्यवाही करू असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा दालनचे आणि अतुल्य हिंमत या पुस्तकाचे प्रकाशन केले त्यावेळी ते बोलत होते.

26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व हुतात्मा पोलिसांच्या शौर्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वंदन केले. प्राणांची पर्वा न करता, कुटुंबियांहून अधिक महत्त्व कर्तव्याला देणाऱ्या या पोलिसांसमोर, त्यांच्या कुटुंबियांसमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नतमस्तक झाले.

26/11 चा हल्ला हा सुन्न करणारा होता. वर्ष उलटत जातील पण काळजावर झालेली जखम भरून न येणारी आहे. मानवंदना, अभिवादन हे सगळं ठीक आहे, ते होत राहील. आम्ही कर्तव्य म्हणून करतो. आम्ही राजकारणी सभा, मोर्चे, मिरवणुका काढतो, हे सगळं एक दिवस. पण, पोलिसांचं काम रोजचं, 24 तास सुरू असतं. खरंतर हे त्यांचं कर्तव्य नाही, उपकार आहेत. स्वत:चं जीवन दुर्लक्षित करून, आपल्या घरातलं सुख-दु:ख, ताणतणाव घरी ठेवून जनेतच्या सुख-दु:खात सामील होतात पोलिस. दिवसभर मेहनत करून घरी जातात. पोलिसही माणूस आहे, त्यालाही घर आहे. पण, त्यांची घरं कशी आहेत, हे पण पाहायला हवं. त्यासंदर्भातही आम्ही काम करतोय असे ठाकरे म्हणाले.

या पुस्तकाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुबोधजींना धन्यवाद दिले. “ हे पुस्तक मी तीन भूमिकांमधून पाहिलं. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, या राज्याचा नागरिक आणि एक कलाकार म्हणूनही. मुख्यमंत्री आणि नागरिक म्हणून मला या पुस्तकाचा अभिमान वाटतोच.” पण, कलाकार म्हणून हे पुस्तक अप्रतिम असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

पोलिसांसाठी काही केलं नाही तर राज्यकर्ते म्हणून आम्ही नालायक ठरू. सक्षमीकरण असं हवं की मुंबई पोलिसांचं नाव घेतलं तरी अतिरेकी मुंबई, महाराष्ट्रावर हल्ला करण्याचा विचारही करणार नाही. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले तसेच  “सध्या आर्थिक चणचण आहेच. पण, त्यातही कोरोना आला म्हणून आपण आरोग्य सुविधा उभारल्याच ना? हेही होईल. म्हणून सांगतोय, ज्या काही तुमच्या योजना असतील त्या घेऊन या. मी वचन देतो जे जे काही करण्यासारखं आहे ते करणार म्हणजे करणारच अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या