‘एनआरसी’त हिंदू भरडले जातील; ‘सीएए’ला घाबरू नका! सरकार टिकेल; धावेल! चिंता नसावी!!

>> संजय राऊत

महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आणि अधिकारांवर गदा येणार असेल तर ते सहन करणार नाही. भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राज्याला विश्वासात न घेता केंद्राने स्वतःकडे घेतला हे बरोबर नाही, असा ‘टोला’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. पाकिस्तान किंवा बांगलादेशी घुसखोरांना हाकला ही शिवसेनेची भूमिका जुनीच असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘सीएए’ कायद्याबद्दलही भीती बाळगायचे कारण नाही. कुणालाही सरसकट देशातून बाहेर काढण्याचा हा कायदा नाही हे मी खात्रीने सांगू शकतो. मात्र एनआरसीचा फटका देशातील हिंदूंनाही बसणार आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

महाविकास आघाडीचे भवितव्य चांगले आहे. पंतप्रधान मोदी व सोनिया गांधी यांना लवकरच दिल्लीत जाऊन भेटू. शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत, ‘रिमोट कंट्रोल’ नाहीत, असा खुलासाही मुलाखतीच्या तिसऱ्या भागात मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.

मुलाखतीचा तिसरा भाग ‘राजकीय’ आणि अधिक रंगतदार झाला. शिवसेनेची पावले कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट झाले.

आपण महाराष्ट्राला पुरोगामी राज्य मानतो. हे शाहू, फुले, आंबेडकरांचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे राज्य वाटचाल करतंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे अनेक महान नेते इथे जन्माला आले. त्यांनी या राज्याला आणि देशाला दिशा दिली…

– म्हणून हा महाराष्ट्र आहे!

तरीही महाराष्ट्रामध्ये अधूनमधून जातीय उद्रेक होत असतात. त्यातलं एक महत्त्वाचं प्रकरण म्हणजे भीमा-कोरेगाव. आपण सत्तेवर आल्यावर काही दिवसांत भीमा-कोरेगावच्या तपासाचं भूत पुन्हा वर आलं. आपल्याकडला तपास राज्य सरकार करीत होतं. त्यावर केंद्रानं झडप मारली. हे कसं काय झालं?

– हे खरं आश्चर्यकारक आहे. आपण म्हणालात, अधेमधे जातीय उद्रेक होतात, पण खरं तर हे होण्याची आवश्यकता नाही. या वेळी तर भीमा-कोरेगावला सर्व शांततेत पार पडलं. लोक जमले. शांततेत निघून गेले. त्या वेळी जे घडलं ते खरं तर घडायला नको होतं. पण त्यावर आता पुनः पुन्हा बोलत बसायची आवश्यकता नाहीय.

पण जो उद्रेक त्या वेळी झाला त्यामागे नक्कीच कुणाचे तरी अदृश्य हात असावेत…

– राज्य सरकार या प्रकरणात तपास करीत होते. या तपासकार्यात केंद्र सरकारचा अधिकारही कोणी नाकारलेला नाहीय; पण तो अधिकार गाजवताना त्यांनी राज्याला विश्वासात घ्यायला हवं होतं किंवा त्यांनी आमचं काय चुकतंय हे सांगायला हवं होतं. चुका लक्षात आणून देणं हाही केंद्राचा अधिकार आहे. आमचा तपास समजा अयोग्य दिशेने चालला असेल तर तो योग्य दिशेने कसा होईल हेही त्यांनी सांगायला हवं होतं. दिशा म्हणजे एकतर्फी असं नाही. पण राज्याच्या तपास यंत्रणांवर केंद्राचा विश्वास नाही का? हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्याचे संबंध विचित्र अवस्थेत जातात.

तुम्हाला यात काही गडबड दिसते का?

– नाही. गडबड नाहीय. मला आश्चर्य वाटतंय की, केंद्राने हा निर्णय घेण्यापूर्वी राज्यास विचारायला हवं होतं. पोलिसांकडून, तपास यंत्रणांकडून नेमका काय काय तपास चाललाय याचा आढावा ते घेऊ शकले असते.

सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातत्याने भीमा-कोरेगाव प्रकरणात तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन करावी अशी भूमिका घेतली आणि त्यानंतर केंद्राने हा तपास ताब्यात घेतला म्हणून यात काही रहस्य आहे का, असा प्रश्न पडलाय.

– हो ना! किंवा कदाचित केंद्राला असं वाटलं असेल की, यांच्या मनात नक्की काय आहे? पण केंद्र सरकारने आम्हाला विचारायला काही हरकत नव्हती. राज्य सरकारची नेमकी भूमिका काय हे ते विचारू शकले असते.

राज्यात घडलेल्या घटनेचा तपास हा राज्याचा अधिकार असू नये?

– बरोबर आहे. राज्याचाच तो अधिकार आहे.

मग केंद्राने राज्याच्या पोलिसांवर अविश्वास दाखवला असं म्हणायचं का?

– राज्याच्या पोलिसांवर अविश्वास कोणीच दाखवू नये. म्हणून मला असं वाटतं की, राज्याची नेमकी भूमिका काय आहे, सरकार म्हणून तुम्ही या तपासात नेमकं काय करताय हे विचारायला हवं होतं. पोलीस कुणाचे गुलाम असता कामा नयेत. तसे ते नाहीयेत. पोलिसांकडे हा तपास होता. त्यामुळे पोलिसांना, राज्य सरकारला त्यांनी विचारायला हवं होतं. ठीक आहे. आम्ही राजकारणी आहोत. मी काही बोलेन, शरद पवारसाहेब काही बोलतील, पण एसआयटीबद्दल ते बोलले हे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. तत्काळ आपण काही निर्णय घेतला होता का, घेत होतो का हे विचारायला हवं होतं. बरं, शरद पवारांनाही त्यांनी विचारायला हवं होतं, की तुम्हाला असं का वाटतंय? की पुन्हा या प्रकरणाचा तपास व्हावा. केंद्राने अचानक राज्यातल्या पोलिसांचा तपास काढून घेतला. मग केंद्राला काय वाटतं हे केंद्राने सांगायला हवं होतं. या सगळय़ा प्रकारात प्रश्नचिन्ह निर्माण करून आरोपाआरोपी करून खऱया तपासाचं होणार काय, कोणत्या दिशेने हा तपास जाणार याचं उत्तर कोण देणार? मधे शरद पवार जे बोलले त्यावरून त्यांना या प्रकरणाचा तपास एका विशिष्ट दिशेने न्यायचा आहे असे का मानायचे आणि केंद्राला दुसऱया दिशेने जायचेच आहे का, हाही प्रश्न आहेच. तुम्ही तपासाची दिशा ठरवून का जाता? निःपक्षपणे चौकशी करा.

घुसखोर हा घुसखोरच असतो. त्यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित नाही करता येणार. मुळात घुसखोरांना हाकला ही भूमिका बाळासाहेबांची आहे. यांनी उगाच श्रेय घेऊ नये. ती बाळासाहेबांनी आधीच ठामपणे मांडली आहे. ही नवीन भूमिका नाही. पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हाकलावं लागेल. कोणी अडवलंय तुम्हाला?

केंद्राचं विचित्र धोरण, सतत तुम्हाला टेन्शनखाली ठेवायचं!

कुणाला तरी वाचवायचा प्रयत्न होतोय असं शरद पवार यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तसं वाटतं का?

– नाही. मी अत्यंत निःपक्षपातीपणे याकडे बघतो आहे. या सगळय़ा प्रकारात कुणालाही मत असण्याचा अधिकार आहे. माझं एक मत असू शकतं. पवारांचं वेगळं मत असू शकतं. काँग्रेसचंही काही मत असू शकतं. भाजपचंही मत असू शकतं. आपल्या मताप्रमाणे इतर कारभार चालवणं आणि एखाद्या गुह्याचा किंवा घटनेचा तपास त्या दिशेने न्यायचा यात फरक आहे. पवार काही म्हणाले याचा अर्थ त्यांना अमुकच एक साधायचं होतं असं मला वाटत नाही. माझं त्यांच्याशी या विषयावर बोलणं झालंय. तपास निःपक्षपाती व्हावा अशीच त्यांचीही इच्छा होती.

सध्या देशात एक प्रश्न उफाळून आला आहे. त्यामुळे राष्ट्रभक्त नक्की कोण अशा शंका वारंवार घेतल्या जात आहेत. तो विषय म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा. देशात भीती आहे, अस्थिरता आहे. ‘सीएए’विषयी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपली भूमिका काय?

– पहिली गोष्ट अशी आहे, याच्यात नवीन काय आणि गंभीर काय आहे? ‘सीएए’ हा विषय समजून घ्या. आपल्या शेजारील राष्ट्रे आहेत. त्यांच्यात पीडित अल्पसंख्याक आहेत. खरं म्हणजे ते हिंदू आहेत! कारण बाजूला आहेत ती पाकिस्तान आणि बांगलादेश ही इस्लामी राष्ट्रे. तर त्यांच्यातले पीडित हिंदू अल्पसंख्याकांपैकी कितीजणांनी असं गाऱहाणं मांडलंय की, आमच्यावर इथे अत्याचार होताहेत आणि आम्हाला तुमच्या देशात यायचंय! यांची संख्या किती हे देशाला का कळत नाहीय? आकडा का सांगत नाही तुम्ही? बरं, या पीडित अल्पसंख्याक हिंदूंना आपल्या देशात ते आल्यानंतर त्यांना कुठे घर देणार आहात? पंतप्रधान आवास योजनेत घरं देणार आहात? त्यांच्या रोजीरोटीचं काय करणार आहात? त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची काय सोय लावणार आहात? हे सगळे विषय महत्त्वाचे आहेत. ते समजून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे.

केंद्राने राज्य सरकारांशी चर्चा करायला हवी होती?

– नक्कीच! एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणून केंद्र सरकारने मला सांगायला नको? हे पीडित लोक कुठे जाऊन राहणार आहेत? धुळे-नंदुरबार, पालघर, मोखाडा अशा ठिकाणी जाऊन राहणार आहेत का? ते आपल्या मुख्य शहरांमध्येच जाणार का? आधीच आमच्या शहरांमध्ये आमच्या लोकांना राहायला घरं नाहीत. रोजगार नाहीयत. रोजगाराचा प्रश्न लटकलेलाच आहे. शिक्षणासाठी मुलांना ऍडमिशन मिळत नाहीयत. त्यात हे जे बाहेरून येणार आहेत ते किती संख्येने येणार आहेत. दिल्लीत राहणार आहेत का? बंगलोरमध्ये राहणार आहेत का? की आता कश्मीरचं 370 कलम हटवलंय, मग तिथे त्यांना घरं बांधून देणार आहे का केंद्र सरकार? कश्मीर खुलं झालंय. नेताय त्यांना तुम्ही तिथे? कारण कश्मीरातले अनेक कश्मिरी पंडित जे आपल्याच देशात निर्वासित म्हणून जगू लागले, त्यांना शिवसेनाप्रमुखांनी आसरा दिला. मग आता जे हे बाहेरून हिंदू इकडे येणार आहेत त्यांना केंद्र सरकार कश्मीरमध्ये जागा देणार आहे का? का नाही देत? केंद्राने सांगायला हवं की, हे जे बाहेरून येणार आहेत त्यांचं आम्ही कश्मीरात पुनर्वसन करतो.

पण ‘सीएए’चे काय?

– मुळात ‘सीएए’बाबत किती गैरसमज आहेत ते आधी दूर करायला हवेत. ‘सीएए’ हा देशातील कोणालाही बाहेर काढण्याचा कायदा नाहीय.

मुसलमान प्रचंड घाबरलेले आहेत…

– सांगतो तुम्हाला. आधी आपण ‘सीएए’बद्दल बोलू. सीएए हा कुणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही. अमित शहांनी म्हटलंय की, हा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. तेवढय़ापुरतं मी मानतो. आपल्या शेजारील देशांतील पीडितांना इथे नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे. इथून कुणालाही बाहेर घालवण्याचा कायदा नाही. आणखी एक गोष्ट आहे ज्याची चर्चा होणार नाही, किंबहुना होत नाहीय, ती आहे एनआरसी. एनआरसी केवळ मुसलमानांना त्रासदायक आहे असं नाहीय. मुळात एनआरसी येणार नाही. किंबहुना आम्ही तो येऊच देणार नाही. एनआरसी अमलात आणण्याचं जर भाजपने ठरवलं तर केवळ मुसलमानांनाच त्रास होणार नाही, तर तुम्हा-आम्हाला आणि देशातल्या हिंदूंना तसेच सर्व धर्मांना त्रास होणार आहे. म्हणजे तिथे त्याबाबतीत तरी सर्वधर्म समभाव येणार आहे.

40 टक्के हिंदूही या कायद्यामुळे संकटात येणार आहेत…

– सगळय़ा नागरिकांना आपलं नागरिकत्व सिद्ध करावं लागणार. म्हणून हा हिंदू-मुसलमान भेद तिकडे येणार नाही. मुसलमानांनी आंदोलन केले, ते रस्त्यांवर आले. हीच भूमिका हिंदूंनी घेतली तर काय कराल? एनआरसी हिंदूंच्या सुद्धा मुळावर येणार आहे. जसं आसाममध्ये झालं. आसामचा विचार केला तर तिथे हा महत्त्वाचा कायदा आहे. आसाममध्ये 19 लाख लोकांना आपलं नागरिकत्व सिद्ध करता आलेलं नाही. म्हणून याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आणि या 19 लाखांत 14 लाख हे हिंदू आहेत. तिथल्या आमदार, खासदारांचे म्हणजेच लोकप्रतिनिधींचे ते कुटुंबीय आहेत.

सैन्यातले अधिकारीही आहेत…

– हो, सैन्यातले अधिकारीही आहेत.

कारगीलमध्ये ज्यांना शौर्यपदके प्राप्त झाली आहेत अशा अधिकाऱयांचे कुटुंबीय आहेत…

– बरोबर आहे. म्हणजेच मी ‘एनआरसी’ला विरोध केला म्हणजे मी राष्ट्रद्रोही आणि तुम्ही पाठिंबा दिलात म्हणजे तुम्ही देशभक्त असं नाही. अरे बाबा, ते ‘एनआरसी’ आले की तुम्हालाही नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी त्या लायनीत उभं राहावं लागणार आहे. तुमचेही आईवडील किंवा कुटुंबीय असतील त्यांनासुद्धा हे भोगावं लागणार आहे. शिवाय महत्त्वाचं म्हणजे, आदिवासींचं काय होणार? जंगल-दऱयाखोऱयातले आदिवासी कोठून आणणार जन्माचे पुरावे? सांगा जरा. आदिवासींना हे कळेल तेव्हा आदिवासीही प्रचंड संख्येनं रस्त्यावर येतील. त्यांच्याकडे नागरिकत्वाचा दाखला मागितला तर हे होणारच आहे. हिंदूंनासुद्धा हे भोगावं लागणार आहे. या देशात बहुसंख्य हिंदू आहेत आणि एनआरसीचा सगळय़ात जास्त त्रास हिंदूंनाच होणार आहे. पण एक लक्षात घ्या. ‘एनआरसी’ हा विषय तूर्त नाहीय. हा विषय आलेला नाही. त्यासाठी आतापासून भुई धोपटण्यात काहीच अर्थ नाही. त्याच्या विरोधात मोर्चे, निदर्शने करण्यात अर्थ नाही आणि समर्थन करण्यातही अर्थ नाही. कारण समर्थनार्थ जे मोर्चे निघतील त्यांनाही… दुर्दैवाने ‘एनआरसी’ आणलाच तर त्यांनासुद्धा त्याचा त्रास होणार आहे.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलावंच लागेल या भूमिकेशी आपण ठाम आहात का?

– का ठाम असू नये? घुसखोर हा घुसखोरच असतो. त्यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित नाही करता येणार. मुळात घुसखोरांना हाकला ही भूमिका बाळासाहेबांची आहे. यांनी उगाच श्रेय घेऊ नये. ती बाळासाहेबांनी आधीच ठामपणे मांडली आहे. ही नवीन भूमिका नाही. पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हाकलावं लागेल. कोणी अडवलंय तुम्हाला? एक उदाहरण देतो. मध्यंतरी ‘लोकसत्ता’ने एक अग्रलेख लिहिला होता निश्चलनीकरणाबाबत. निश्चलनीकरणाच्या निर्णयाचे एक कारण सांगितलं गेलं होतं त्या वेळी…ते होतं खोटय़ा नोटांचं. संपूर्ण अर्थव्यवस्थेत किती टक्के खोटय़ा नोटा होत्या? काही टक्क्यांत असतील. पण त्या काही टक्क्यांसाठी तुम्ही संपूर्ण चलनी नोटांचे कागदाचे तुकडे केलेत, तसे काही टक्के घुसखोरांसाठी संपूर्ण देशाला रांगेत उभं करताय. मला असं वाटतं, या सरकारचं एक विचित्र धोरण आहे…सतत तुम्हाला टेन्शनखाली ठेवायचं.

हिंदू आणि मुसलमान अशी फाळणी करून निवडणुका जिंकाव्यात असं कुणी घडवतंय असं आपल्याला वाटतं का?

– एनआरसी आणण्याची हिंमत आहे का यांच्यात? मग का तुम्ही हा भेदभाव करताय? त्यांना असं दाखवायचंय की आम्ही घुसखोरांना काढू इच्छितो, पण हे काढू देत नाहीत. म्हणजे हे दोशद्रोही आहेत. झालं, त्यांचं काम झालं. निवडणुका जिंकले. पण हे आता होणार नाही. कारण ‘एनआरसी’चा अर्थ लोकांना हळूहळू कळू लागला आहे. नागरिकत्व सिद्ध करणे हे केवळ मुसलमानांपुरतं नाही, तर हिंदूंनासुद्धा जड जाईल. आणि तो कायदा मी येऊ देणार नाही. मी मुख्यमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री नसलो तरी मी कोणालाही कोणाचाही अधिकार हिरावू देणार नाही.

तुम्ही म्हणताय की, ‘एनआरसी’ येऊ देणार नाही…

– कारण त्यात सगळेच भरडले जात आहेत…हिंदूसुद्धा.

मग ‘सीएए’ येऊ देणार का? अनेक राज्यांनी केंद्राच्या विरोधात ठराव केलेत की, आम्ही ‘सीएए’ लागू करणार नाही. महाराष्ट्र अशा प्रकारचा ठराव करणार आहे का?

– त्याची गरजच नाही. याचं कारण असं, मी पुन्हा सांगतो की, इथून कुणालाही घराबाहेर काढणं हे ‘सीएए’मध्ये येत नाही. ‘सीएए’ म्हणजे बाजूच्या देशांतील जे पीडित अल्पसंख्याक आहेत, जे हिंदू आहेत त्यांना आपल्या देशात सामावून घेण्यासाठी आहे. पण केंद्राने जबाबदारी स्वीकारून जे बाहेरून येणार आहेत त्यांच्या घरादाराचा विषय सोडवला पाहिजे.

शाहीन बागसारखे प्रकार जे दिल्लीत सुरू आहेत ते आता महाराष्ट्रात सुरू आहेत…

– त्याची काही गरज नाहीय.

कुणीतरी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करताहेत का?

– असतीलही!

अशाप्रकारचे विषय आणून महाराष्ट्रासारखी राज्ये…जिथे भाजपची सत्ता नाहीय तिथे अस्थिरता निर्माण करायची, दंगेधोपे घडवायचे आणि राज्य उलथून टाकायचे…

– याला हे लोक हिंदुत्व म्हणतात?

कट आहे असं वाटतं का तुम्हाला?

– मुळात याला हिंदुत्व मानायचं का? त्या कटाची पर्वा मी करत नाही.

नाही, हे हिंदुत्व नाहीय.

– हे हिंदुत्व नसेल तर मग मी कुणापासून फारकत घेतली. हे माझे समविचारी आहेत काय? धर्माचा उपयोग करून होळी पेटवून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही, अजिबात नाही. हिंदू राष्ट्र पाहिजे असं हे रोज म्हणतात. पण ते असं जळणारं अशांत हिंदू राष्ट्र मला अपेक्षित नाही. हे हिंदू राष्ट्र मी नाही मानणार. माझं हिंदू राष्ट्र -त्याची व्याख्या वेगळी आहे. माझ्या वडिलांनी शिकवलेलं हे हिंदुत्व नाही. माणसं माणसाला मारतील हे हिंदुत्व नाही. हिंदुत्वाविषयी गैरसमज पसरवून किंवा दुरुपयोग करून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही.

म्हणजे हिंदुत्व कायम आहे?

– अर्थात! हिंदुत्व कायम आहे. हिंदुत्व कायम असल्यानंतर पक्ष म्हणून माझी मतं कायम आहेत. माझ्या श्रद्धा आहेत त्या. सरकार चालवताना त्याचा प्रश्न येतोच कुठे! असं कोणतं सरकार दाखवा मला, जे घटनाबाह्य चालवताहेत. नरेंद्र मोदी घटनेला धरून सरकार नाही चालवत? हिंदुत्वाच्या आधारावर सरकार चालवताहेत का? सांगा मला. शेवटी राममंदिराचा निर्णय घटनेनुसार, सर्वोच्च न्यायालयातच झाला ना?

तुमच्या मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ सहकारी अशोक चव्हाण…

– हो. मला माहीत आहे. त्यांच्या विधानाची सध्या चर्चा आहे.

अशोक चव्हाणांनी असं म्हटलंय की, आम्ही शिवसेनेकडून लिहून घेतलं की, हे सरकार घटनेनुसार चालेल…

– केवळ शिवसेनेनेच नाही, तर तिन्ही पक्षांनी लिहून दिलेलं आहे. आम्ही सर्वांनी लिहून दिलाय तो कॉमन मिनिमम प्रोग्रॅम! त्याच्यामध्ये दहा रुपयांत थाळी आहे, शेतकऱयांची कर्जमुक्ती आहे, एका रुपयात आरोग्य चाचणी आहे… हीच आमची घटना आहे. संविधान!!

म्हणजे अन्न, वस्त्र्ा, निवारा हा विषय आहे…

– हो. अर्थातच अन्न, वस्त्र्ा, निवारा… आमची शपथच मुळी घटनेच्या आधारे असते. जेव्हा मंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली जाते ती शपथ घटनेतलीच असते… मोदीसुद्धा घटनाबाह्य सरकार चालवू शकत नाहीत. त्यांचंसुद्धा सरकार हे घटनेला धरूनच आहे…आणि ते जेव्हा घटनाबाह्य वागतील तेव्हा राष्ट्रपती त्यांचंही सरकार बाद करतील.

घटनेच्या चौकटीतच सरकार चालवू असं म्हटल्यामुळे शिवसेना काँग्रेसपुढे किंवा सोनिया गांधींपुढे ‘सरेंडर’ झाली असं चित्रं निर्माण केलं जातंय…

– ‘सरेंडर’ झाली म्हणजे काय झाली?

घटनेनुसार राज्य चालवणाऱयांना सरेंडर होणं कसं काय म्हणता येईल असं मी विचारतोय…

– तेच माझं म्हणणं आहे. घटना सगळेच मानतात. आणि मी माझा पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून माझं जे हिंदुत्व आहे ते आमचं धोरण आहेच. काँग्रेसने त्यांचा सर्वधर्म समभाव सोडलाय का? नाही सोडलेला. मग मीही माझं हिंदुत्व नाही सोडलेलं. पण सरकार म्हणून घटनेच्या चौकटीत जे पाळावं लागतं तेही पाळतोच…ते सगळय़ांनीच लिहून दिलं आहे.

उद्धवजी, हे राज्य आपण चालवताय… तीन पक्षांचं सरकार आहे. सरकार चालवताना अशा प्रकारचं…खरं म्हणजे हे सरकार जर दुसऱया कुणी बनवलं असतं तर त्याला ‘खिचडी सरकार’ ही उपमा लोकांनी दिली असती…

– हो मग काय झालं? शेवटी गरीबांना खिचडीच लागते… गरीबांना कोणी बिर्याणी देत नाहीत.

पण या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे करताहेत… म्हणून हे मजबूत सरकार आहे…

– मी आव्हान म्हणून स्वीकारलेलं आहे.

या सरकारमध्ये आपल्या आसपास ‘मानवी बॉम्ब’ आपल्याला दिसताहेत का? सरकार चालवताना…

– अजिबात नाहीयेत…कारण आता त्या तथाकथित मानवी बॉम्बच्या वाती विझून तिकडे आता नाती निर्माण झाली आहेत.

अजित पवार…?

– अजित पवार हे एक चांगले सहकारी आहेत असे मी म्हणेन… नक्कीच चांगले आहेत. विषयाची त्यांना जाण आहे, अभ्यास आहे. ठीक आहे… विरोधक ते होते ना. ते काही मी लपवून ठेवलं तरी ते लपणार नाहीये. कालच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही एकमेकांवर कडाडून टीका केलेलीच आहे; पण आता एकत्र येऊन सरकार चालवताना एकमेकाला जे आम्ही सांभाळून घेत आहोत. अगदी अशोक चव्हाणसुद्धा बोललेत…ठीक आहे. पण त्यात चूक काही नाहीये… घटनेला धरून राज्य चालवण्याचं बंधन सगळ्या सरकारवरती असतं. पण अशोक चव्हाणसुद्धा मंत्रिमंडळात मला चांगलंच सहकार्य करताहेत.

अजित पवार प्रशासक म्हणून ते काम करताहेत… उत्तम नेते आहेत ते, अभ्यासू आहेत हे सत्यच आहे…

– खरोखरच माझे एक सहकारी म्हणून त्यांची मला मदत मिळते.

उद्धवजी… या सरकारला ‘बाप’ किती?

– बाप हा एकच असतो…आईही एकच असते.

या सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ दुसऱया कोणाकडे आहे का?

– रिमोट कंट्रोल वगैरे असा काही प्रश्न नाहीये. आम्ही तीन वेगळे पक्ष आहोत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. आणि हो, तुमच्या प्रश्नाचा रोख मला कळला… तुम्हाला शरद पवारांविषयी विचारायचं आहे का? तर शरद पवारसुद्धा रिमोट कंट्रोल म्हणून वागत नाहीत… त्यांच्या काही सूचना असतील तर त्या जरूर करतात.

अनुभवी आहेत ते…

– हो निश्चितच. त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांच्या अनुभवाने ते मला नक्कीच मार्गदर्शन करतात. समजा काही विषय असला तर मीही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो. पण त्यांचंसुद्धा एक वैशिष्टय़ आहे… त्यांना एखादी गोष्ट नीट समजावून सांगितली तर एका क्षणात ते म्हणतात, ठीक आहे… तुमचं म्हणणं बरोबर आहे.

महाविकास आघाडीचं भवितव्य काय?

– बिलकूल चिंता करू नका. महाविकास आघाडीच्या बरोबरीने महाराष्ट्राचं भवितव्यही उज्ज्वल आहे.

आज आपण सत्तेमध्ये एकत्र आहात. सत्तेसाठी एकत्र राहाल…पण ही महाविकास आघाडी भविष्यातसुद्धा पुढे जाईल का?

– जायला काय हरकत आहे? आणि न जावं असं कारण काय? जर तिघांनी एकमेकांच्या मर्यादा ओळखल्या असतील आणि तशा त्या ओळखल्या आहेतच, तर आपल्या मर्यादेमध्ये जास्तीत जास्त टप्पा किंवा दरमजल सहज साध्य करू शकतो. पण एखादा आपल्या आवाक्याच्या बाहेरचं काही करायला गेला तर तो आपटतो…

आपण आता मनानं बीजेपीबरोबर नाही आहात किंवा पूर्णपणे तुटलेले आहात… आपण आपली दिशाच वेगळी करून घेतली आहे का?

– नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो की, हा काही खेळ नाहीये. 25-30 वर्षे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत होतो. आणि ते केवळ एक राजकारणातली अपरिहार्यता म्हणून नव्हतो. त्याच्यामध्ये जसे प्रमोदजी होते, गोपीनाथजी होते… शिवाय अटलजी, अडवाणीजी, नितीनजीसुद्धा… त्यांच्याबरोबर आमची एक पारिवारिक अशी नाती किंवा ऋणानुबंध निर्माण झाले होते… आणि ते तुटताना यातना तर झाल्याच… नक्की झाल्या… मी आनंदी आहे का? मी रागावलो आहे का? त्यापेक्षा मला या सगळय़ा गोष्टीचं दुःख जास्त झालेलं आहे. तुम्ही कोणाला फसवलंत? जो माणूस तुमच्यापाठी पहाडासारखा उभा राहिला… संकटकाळामध्ये पहाडासारखा उभा राहिला… हिंदुत्वावरची सगळी आक्रमणं होती, धोके होते ते त्यांनी स्वतःवरती घेतले… त्या शिवसेनाप्रमुखांच्या पक्षाबरोबर तुम्ही एकत्र राहू शकत नाही…?

विश्वासघात केला…

– होय, विश्वासघात केला…असंच आता म्हणावं लागेल. कडवट हिंदुत्ववादी पक्षाला तुम्ही दूर ढकललंत…आणि नको ते पक्ष तुम्ही मांडीवर घेऊन बसलात. हे कसलं हिंदुत्व आहे.

नको ते पक्ष म्हणजे तुम्ही ‘मनसे’विषयी म्हणताय का? वृत्तपत्रांतल्या बातम्यांनुसार असं कळतंय की, हे दोन पक्ष एकत्र येताहेत…

– तो विषय गौण आहे. पण नितीशकुमार आहेत, मुफ्ती आहे, चंद्राबाबू आहेत, रामविलास आहेत… सगळेच आहेत. म्हणजे त्यांचे जे कडवट विरोधक होते ते तुम्हाला तुमच्या मांडीवर चालतात; पण कट्टर हिंदुत्ववादी पक्ष जो तुमच्यासोबत संकटकाळात राहिला… तो मात्र नकोसा होतो. ही नाती फक्त सत्तेसाठी नव्हती. या 30 वर्षांमधला किती काळ आम्ही सत्तेत होतो?

फार कमी वेळ होतात…

– सत्तेत होतो त्याहून अधिक विरोधी पक्षातला काळ आमचा मोठा आहे…आणि जेव्हा संपूर्ण देशामध्ये तुम्हाला काही स्थान नव्हतं तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी तुमचं रक्षण केलं होतं…अडीअडचणींना धावून आले होते…सोबत दिली होती… संकटकाळाच्या मित्राला तुमचे सुखाचे दिवस आल्यावर तुम्ही सोडून दिलंत… हे हिंदुत्व माझं नाही… मला मान्य नाही.

तुम्ही दरवाजे बंद केले आहेत भाजपसाठी…पण खिडकीची फट एखादी उघडी आहे का कुठे?

– नाही…अशी खिडकीची फट…दरवाजे… हा प्रकार माझ्याकडे नसतो. जे करायचे तर दिलखुलासपणे करायचं…जेव्हा सोबत होतो तेव्हा दरवाजाबाहेर गेलात का? तुम्ही स्वतः गेलात. तुम्ही दरवाजा बंद करून बसलात.

मी ‘एनआरसी’ला विरोध केला म्हणजे मी राष्ट्रद्रोही आणि तुम्ही पाठिंबा दिलात म्हणजे तुम्ही देशभक्त असं नाही. अरे बाबा, ते ‘एनआरसी’ आले की तुम्हालाही नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी त्या लायनीत उभं राहावं लागणार आहे. तुमचेही आईवडील किंवा कुटुंबीय असतील त्यांनासुद्धा हे भोगावं लागणार आहे. शिवाय महत्त्वाचं म्हणजे, आदिवासींचं काय होणार? जंगल-दऱयाखोऱयातले आदिवासी कोठून आणणार जन्माचे पुरावे? सांगा जरा. आदिवासींना हे कळेल तेव्हा आदिवासीही प्रचंड संख्येनं रस्त्यावर येतील. त्यांच्याकडे नागरिकत्वाचा दाखला मागितला तर हे होणारच आहे. हिंदूंनासुद्धा हे भोगावं लागणार आहे. या देशात बहुसंख्य हिंदू आहेत आणि एनआरसीचा सगळय़ात जास्त त्रास हिंदूंनाच होणार आहे.

पहिली गोष्ट अशी आहे, याच्यात नवीन काय आणि गंभीर काय आहे? ‘सीएए’ हा विषय समजून घ्या. आपल्या शेजारील राष्ट्रे आहेत. त्यांच्यात पीडित अल्पसंख्याक आहेत. खरं म्हणजे ते हिंदू आहेत! कारण बाजूला आहेत ती पाकिस्तान आणि बांगलादेश ही इस्लामी राष्ट्रे. तर त्यांच्यातले पीडित हिंदू अल्पसंख्याकांपैकी कितीजणांनी असं गाऱहाणं मांडलंय की, आमच्यावर इथे अत्याचार होताहेत आणि आम्हाला तुमच्या देशात यायचंय! यांची संख्या किती हे देशाला का कळत नाहीय? आकडा का सांगत नाही तुम्ही? बरं, या पीडित अल्पसंख्याक हिंदूंना आपल्या देशात ते आल्यानंतर त्यांना कुठे घर देणार आहात? पंतप्रधान आवास योजनेत घरं देणार आहात? त्यांच्या रोजीरोटीचं काय करणार आहात? त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची काय सोय लावणार आहात? हे सगळे विषय महत्त्वाचे आहेत. ते समजून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे.

होय, मंत्रालयात शिवसैनिकांना मुक्त प्रवेश आहे!

25 वर्षे युतीत सडली ही आपली भूमिका होती कायम त्या वेळेला…

– हो, बरोबर. मी ते जाहीरपणे अनेकदा बोललोय.

आता तर आपण त्या युतीतून बाहेर पडला आहात. पण एक प्रश्न माझ्या मनात कायम असतो की, गेल्या वेळी युती नसताना स्वबळावरती आपण 63 आमदार जिंकून आणले…

– नक्कीच…

आणि जेव्हा युती झाली परत तेव्हा आकडा घसरून या वेळी 56 वरती आला… त्याची मीमांसा आपण कशी कराल?

– नाही. त्याची मीमांसा हे नुसते अंदाज आणि तर्क होऊ शकतात. पण युतीमध्ये भाजपचा पण आकडा घसरला आणि आमचाही घसरला.

तरी त्यांनी शंभरी पार केली…

– शंभरी पार केली की शंभर भरले… म्हणजे आमदार म्हणतोय मी! निवडणुकीत काय झालं, कसं झालं याविषयी अनेक मतमतांतरं आहेत, पण आता ते काही लपून राहिलेले नाहीये. एक तर आमच्याकडे ठरल्याप्रमाणे 144 जागा पाहिजे होत्या. पण हिंदुत्वासाठी मी तडजोड केली. 124 घेतल्या. हीसुद्धा एक फसवणूकच होती म्हटलं तर. मधे बाळासाहेबांचं भाषण पण सोशल मीडियावर फिरतंय की, हिंदुत्वासाठी काही वेडंवाकडं आम्ही सहन नाही करणार. आम्ही तुमची धुणीभांडी करावी हे काही हिंदुत्व नाहीये…मान-सन्मानाने राहू… हिंदुत्वासाठी थोडंसं कमी आम्ही घेऊ…काही हरकत नाही…कारण हिंदुत्व हेच आमचं मोठं उद्दिष्ट आहे; परंतु याचा अर्थ असा नाही की, आम्ही तुमचे गुलाम म्हणून राहायचं. ते नाही चालणार मला…

मधल्या काळात चंद्रकांत पाटील यांनी एक चांगलं स्टेटमेंट केलं… चांगल्या अर्थाने म्हणतोय… भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत… ते म्हणाले की, इनकमिंगमुळे भाजपची संस्कृती बिघडली…चेहरा बदलला…

– हे आधी कळलं असतं तर बरं झालं असतं.

शिवसेनेतसुद्धा मागच्या काळामध्ये प्रचंड इनकमिंग झालं… आपण करवून घेतलंत… हे बरंचसं इनकमिंग पराभूत झालं. लोकांनी स्वीकारलं नाही. कारण लोकांना मूळ चेहरा… मूळ संस्कृती हवी असते.

– बरोबर आहे…

कारण ज्यांना आपण घेतलंत त्यातले 99 टक्के लोक पराभूत झालेले आहेत. आणि हे महत्त्वाचे तालेवार लोक होते त्या त्या पक्षातले…

– होय… बरोबर आहे… काय करणार त्याला!

त्याच्यामुळे चंद्रकांत पाटलांचं जे स्टेटमेंट आहे ते शिवसेनेलाही लागू होतं?

– जर निकाल बघितले तर लागू होतं. पण त्याच्यामध्ये आम्ही अगदीच जसं भारतीय जनता पक्षाने वाट्टेल ते लोक घेतले तसे वाट्टेल ते लोक नाही घेतले. तीसुद्धा लोकं आम्ही चाचपून घेतली आणि विशेषतः जिथे नाइलाजाने म्हणा की शिवसेनेकडे योग्य उमेदवार किंवा… योग्य हे मी कोणत्या अर्थाने म्हणतो… निवडून येण्याच्या अर्थाने… शिवसेना ही कानाकोपऱयात पसरलेली आहे. पण निवडणूक जिंकण्यासाठी काही वेळेला एखादा चेहरा घ्यावा लागतो…

पण चेहरे पडले…

– तेच मी म्हणतोय. तिथे मी काही इनकमिंग केलं. जरूर केलं…आणि हे सगळय़ा पक्षामध्ये होतं. पक्षात काही नवीन लोकं येतात त्याचबरोबर पक्षातून काही लोकं जातात. ते सगळेच जिंकतात असं नाही…आणि येणारे सगळेच हरतात असेही नाही.

आपण मुख्यमंत्री आहात… महाराष्ट्रासारख्या एका बलाढय़ आणि मोठय़ा राज्याचे… आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख आहात… दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. एखाद्या पदावरती अन्याय होईल असं वाटत नाही का?

– सध्या मी माझ्या शिवसैनिकांपासून थोडासा दुरावलो हे नक्की. मनाने मात्र नक्कीच दुरावलो नाही. पण हे काम अंगावर घेतल्यानंतर मी ही सगळी खाती समजून घेतोय…आणि ती घेतली जवळपास. ती समजून घेत असताना मला या कामासाठी जेवढा वेळ देणं गरजेचं होतं तेवढा देतोय. कारण राज्याचा कारभार महाप्रचंड आहे आणि प्रत्येक खातं हे खूप इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक खातं हे काम करायला अतिशय चांगलं आहे. कोणतेही खातं असं नाही की, जिकडे कामच नाही. प्रत्येक खातं इंटरेस्टिंग आहे…आणि हे समजून घेतलं मी की, या खात्यामध्ये नेमकं काय काय करू शकतो…काय काय होऊ शकतं.. याचे बजेट किती आहे… काय आवश्यकता आहे… नवीन काय होऊ शकतं… आणि त्याच्यासाठी हे काही मधले दिवस माझे नक्की गेले.

शतप्रतिशत शिवसेना हे जे आपलं स्वप्न होतं…

– ते पक्षप्रमुख म्हणून आहेच! पण आता तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचा विकास हेच उद्दिष्ट. तुम्ही म्हणालात की, उद्योगधंदे राज्याबाहेर गेले… हे गेले, ते गेले… नुसतं पक्षीय राजकारण हे त्या पक्षापुरतं ठीक आहे. परंतु शेवटी तुमचा पक्ष… माझा पक्ष… याचा पक्ष, त्याचा पक्ष… प्रत्येक पक्ष जनतेस उत्तरदायी असतो. ही महाराष्ट्राची जनता आहे…आणि त्यांचे प्रश्न हे सोडविण्याची संधी आपल्याला मिळाल्यानंतर त्या सोडवण्याला प्राथमिकता देणं हे मला वाटतं माझं आजचं कर्तव्य आहे.

मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली महाराष्ट्राच्या किंवा कोणत्याही राज्याच्या… की त्याला आधी दिल्लीत जावं लागतं… तुम्ही अद्याप गेला नाहीत दिल्लीत?

– अशी काही जबरदस्ती नाहीये…आणि असा काही मला दिल्लीचा राग किंवा दुस्वासही नाहीये…जेव्हा मला आवश्यकता असेल तेव्हा मी जरूर जाईन दिल्लीत.

मोदी आणि सोनिया गांधींना भेटणार का?

– का नाही भेटायचं? नक्कीच भेटेन. मोदींना भेटेन…सोनियाजींना भेटेन…आडवाणींना भेटेन…आणखी कोण चांगली मोठी लोकं आहेत त्यांनाही जरूर भेटेन… का नाही भेटायचं?

महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली व्यक्ती भविष्यात राष्ट्रीय राजकारणात जाते…नेतृत्व करण्यासाठी. महाराष्ट्राला आपल्याकडून अपेक्षा आहेत. देशालाही अपेक्षा आहेत… आपण कधी याचा विचार केलाय का?

– मी मुख्यमंत्री पदाचाच विचार केला नव्हता तर याचा काय करणार? आवाक्याबाहेरच्या गोष्टी कधी माझ्या स्वप्नातही येत नाहीत…आणि अशी माझी वेडीवाकडी स्वप्नेही नाहीयेत…मुळात मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की, हेच माझं स्वप्न नव्हतं… पण शिवसैनिक मुख्यमंत्री बनवणार हे माझं वचन आणि हे माझं स्वप्न आहेच…

आता बनलेला आहे…

– नाही. तुम्ही लक्षात घ्या, मी पक्षप्रमुख आहे…आणि जी आमच्या घराण्याची परंपरा आहे, त्याच्यामध्ये मीच माझ्यासाठी काही करणं याचा मी कधीच विचारही केला नाही आणि करू शकणार नाही. ते आमच्या घराण्याचं अलिखित धोरण आहे.

आदित्य ठाकरेसुद्धा आता महत्त्वाचं मंत्रीपद सांभाळताहेत…

– हो…

तेसुद्धा आपल्या पावलावर पाऊल टाकून आता पुढे चालले आहेत. आपण मुख्यमंत्री असताना आदित्यनी मंत्री व्हावं याच्यावर थोडी टीका झाली…

– बाळासाहेबांनी काही स्वीकारलं नव्हतं. पण त्यांच्यावरही टीका झाली होती.

हे पितापुत्रांचं सरकार आहे अशी विरोधकांनी टीका केली आहे…

– ठीक आहे… हरकत नाही… म्हणून मी म्हटलं ना… बाळासाहेबांनी काही स्वीकारलं नव्हतं, कोणतेही पद आयुष्यात घेतलं नाही, तरी त्यांच्यावर टीका करणारे करतच होते… मुळामध्ये याचा मी विचार केला. आदित्य अत्यंत तळमळीने आणि मनापासून हे काम करतोय…

पर्यावरण आणि पर्यटनात त्याने चांगलं काम केलं आहे…

– त्याने स्वतःहून हा निर्णय घेतला. निवडणुकीला उभा राहिला… सगळय़ा वरळीकर जनतेने त्याला प्रचंड बहुमताने निवडूनही दिले. म्हणजे तो त्याच्यात स्वतःहून आलेला आहे. त्याची इच्छा जर याच्यामध्ये पुढे कारकीर्द करण्याची असेल तर अनपेक्षितपणाने मी हे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मी त्याच्या वाटचालीतला धोंडा बनावं का?

आपलं म्हणणं बरोबर आहे…

– ठीक आहे ना… मी काय किंवा बाळासाहेबांनी काय… बाळासाहेबांनी तर कोणतंच पद स्वीकारलं नाही… आता ही मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर जर जनता माझ्या मुलाला म्हणून नव्हे, तर आदित्यला म्हणून स्वीकारत असतील तर त्याच्या वाटचालीतला अडथळा मी बनावं का?

राजकारणामध्ये लोक हयात घालवतात… मुख्यमंत्री होण्यासाठी आणि मुख्यमंत्री झाल्यावर ‘वर्षा’ या बंगल्यावर जाण्यासाठी… पण आपण ‘वर्षा’वर गेला नाहीत…याचं कारण काय?

– येत्या वर्षात जाईन.

येत्या वर्षात जाणार… की तिथे मागच्या मालकांनी होम-हवन केले… काही इतर प्रकार केले… भिंतीवरती आपल्याविरोधात काही लिखाण केले म्हणून आपले पाय अडखळताहेत…

– नाही नाही… मी प्रबोधनकारांचा नातू आहे…अंधश्रद्धांच्या असल्या भाकडकथा माझ्याकडे चालत नाहीत. एक गोष्ट अशी आहे की, माझं ‘मातोश्री’ मला प्यारं आहे. माझं हक्काचं घर आहे. वडिलोपार्जित आहे. ‘मातोश्री’ हा मिळालेला आशीर्वाद आहे तो मला…

परंपरा आहे त्या घराला…

– परंपरा आहे…आणि ते माझं वैभव आहे… ‘वर्षा’वर मी जाईन… पण राहीन असं नाही; पण कामकाजासाठी तिथे जरूर माझं जाणं-येणं चालू राहील.

महाराष्ट्रात सत्तांतर झालं. राज्याची जनता प्रचंड खूश आहे. हे परिवर्तन ज्या पद्धतीने घडलं… वेगवान नाटय़ घडलं त्यामध्ये… पण शिवसेनेला हे दिवस दाखवण्यामागे या राज्यातील लाखो शिवसैनिकांचा त्याग आहे, संघर्ष आहे, बलिदानसुद्धा आहे… आणि आपण त्यांचं नेतृत्व करताहात… इतकी वर्षे करत आलेला आहात. हे सरकार…ही सत्ता शिवसैनिकाला आपली वाटेल, स्वतःची वाटेल यासाठी मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडे काही वेगळी योजना आहे का?

– शिवसैनिकांना मला हेच सांगायचंय की, तुम्ही आनंदाने मंत्रालयात या… तिकडे मी नाही, तर तुम्ही स्वतः बसलेला आहात.. माझ्या रूपाने तिकडे शिवसैनिक बसलेला आहे. त्यांच्या हक्काचं हे सरकार आहे आणि या सरकारचा उपयोग, सत्तेचा उपयोग…आजपर्यंत ज्या तुम्ही काही खस्ता खाल्ल्या… आपल्या एक-दोन पिढय़ा आधीच्या त्यांनी ज्या खस्ता खाल्ल्या, आंदोलने केली, अनेक ठिकाणी अन्यायाविरुद्ध मोर्चे काढले, आवाज उठवला… आता हे प्रश्न सोडवण्यासाठी या सत्तेचा सदुपयोग करून घ्या… या ताकदीवर स्वतःच्या पायावर उभे राहा…अगदी काही तुंबडय़ा भरणं हा विषय नाहीये. पण जे काही हक्काचं असेल, न्यायाचं असेल ते करून घ्या… अगदी मी महिलांनासुद्धा सांगतोय…

शिवसैनिकाला मंत्रालयात प्रवेश आहे का? मुक्त प्रवेश आहे का?

– मुक्त प्रवेश हा शिवसैनिकांना आहेच…सर्वसामान्य जनतेलाही आहे… आणि म्हणून मी सांगतो की, कदाचित नव्हे तर लवकरात लवकर फक्त मुंबईच नाही, तर इतरत्र कार्यक्रमाच्या निमित्ताने जाईन तेव्हा शाखाभेटी पण करेन.

अनेकदा असं दिसतं की, जेव्हा जेव्हा आपण सत्तेत गेलो किंवा सत्ता आपल्याकडे आली.. मग मनोहर जोशींचा काळ जरी घेतलात तो संपूर्ण… तरी मंत्रालयामध्ये फक्त उपरणी बदलली जातात… त्याचे रंग बदलले जातात… दलाल तेच असतात.

– नाही. दलालांना इथे प्रवेश नाही. माझ्या आसपास कोणी दलाल तुम्हाला दिसणार नाही. त्याने माझ्या जवळपास येण्याचे धाडसही करू नये. मी पुन्हा एकदा सांगतो, तीन पक्षांचं सरकार आहे… मी कोणासोबतही पक्षपातीपणाने वागत नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते येतात, हक्काने येतात. राष्ट्रवादीचे येतात. शिवसैनिक पण येतात. आणि शिवसैनिकांना तिथे कधी दार बंद होणार नाही. मी पुन्हा सांगतो की, तिकडे उद्धव ठाकरे नाही तर आपण स्वतः बसलेला आहात…

महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचे आता आपण आशास्थान आहात. हे राज्य जे आहे महाराष्ट्र… मुंबईसह… हे शेतकऱयांच्या, कष्टकऱयांच्या रक्तातून आणि घामातून उभं राहिलेलं आहे. शहरं जरी वाढत असली तरी आजही ग्रामीण भागामधले प्रश्न तेच आहेत आणि ते आपल्याकडे मुख्यमंत्री म्हणून, ठाकरे म्हणून अपेक्षेने पाहात आहेत. तुम्ही त्या सगळय़ांना आज काय सांगाल?

– आपण नेहमी असं म्हणतो की, काळ बदलला आहे… काळाप्रमाणे बदलायला पाहिजे. आज या सुविधा तळागाळापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत पोहचताहेत. शिक्षण पोहचतंय. शिक्षण पोहचल्यानंतर शिक्षणाला अनुसरून रोजगाराच्या संधी, रोजगार, उद्योगधंदे… हे अजून जेवढय़ा गतीने पोहोचायला हवं ते पोहोचत नाही.. म्हणजे थोडासा हा अडथळा निर्माण होतोय.. जसं शिक्षण हे आपण खालपर्यंत पोहोचवतो आहोत… अजूनही पूर्णपणे पोहोचलंय असा माझा दावा नाहीये. पण आता वेगवेगळे तंत्रज्ञान उपलब्ध झालेले आहे, शिक्षण उपलब्ध झालेलं आहे; पण प्रत्यक्ष त्या हाताला काम अजून मिळत नाहीये… तर आता माझा प्रयत्न हाच आहे की, जसं शहरांमध्ये उद्योगधंदे… म्हणजे मुंबईमध्ये आता नवीन उद्योगधंदे येऊ शकत नाहीत… म्हणून मुंबईत पर्यटन, टुरिझम कसं वाढेल त्याच्याकडे जास्त लक्ष देतोय. राज्यामध्येसुद्धा आपल्याला पूर्ण कोकण किनारपट्टी आहे… ऐतिहासिक गडकिल्ले आहेत, लेण्या आहेत, धार्मिक स्थळे आहेत… जंगलं आहेत… खूप चांगली ठिकाणं आपल्या राज्यात आहेत. इथे पर्यटन वाढलं पाहिजे. पर्यटन वाढल्यानंतर तिकडे इतर उद्योगधंदे… जसा समृद्धी महामार्गाचा उल्लेख केला त्या समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा काही ठिकाणी आपण या नवीन शहरांना किंवा गावांना वसवण्यासाठी आपण जागा ठेवतो आहोत. त्यांना इफ्रास्ट्रक्चर कसं उपलब्ध करून देता येईल… हे सगळं काम जेव्हा होईल त्यासाठी प्रयत्न हाच आहे की, ते लवकर व्हावं. ते झाल्यानंतर ही दोन टोकं जेव्हा मिळतील… शिक्षण आणि उद्योग… त्या वेळेला खरा आपला विकास होईल.

एक अत्यंत आवडीचा मंत्र आपण नेहमी महाराष्ट्राची लोकं जपतो आणि शिवसेनाप्रमुखांनीसुद्धा तो मंत्र वारंवार जाहीरपणे सांगितला… ‘महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठय़ाविना राष्ट्रगाडा न चाले… खरा वीर वैरी पराधीनतेचा… महाराष्ट्र आधार या भारताचा…’ हा जो महाराष्ट्र तुमच्या नेतृत्वाखाली आज नव्याने घडतो आहे… हा महाराष्ट्र दिल्लीचा आधारस्तंभ बनेल का?

– हा महाराष्ट्र देशाला नवीन दिशा दाखवतोय… आणि म्हणून तीन पक्षांच्या सरकारच्या नेतृत्वाची धुरा मी एक आव्हान म्हणून स्वीकारलेली आहे. प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो की, महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. त्या महाराष्ट्रात जन्माला आलेले आपण लोक इतिहासामध्ये रमण्याच्या बरोबरीने इतिहास घडवण्याच्या मागे लागलं पाहिजे. आणि मला असं वाटतं, माझ्यात आत्मविश्वास आहे. सगळय़ांनी सहकार्य केलं तर आपलं राज्य हे देशाला नवी दिशा दाखवेल.

जो परिवर्तनाचा प्रयोग महाराष्ट्रात झाला आज तो दिशादर्शकच आहे देशाला…

– आहेच… म्हणूनच मी म्हणतोय की, एक दिशा दाखवली जातेय. हे सरकार काहीजणांना चालावं असं वाटतं…

साहजिकच आहे. काहीजणांना न चालावं असं वाटतं… पण हे सगळं हे जनतेच्या इच्छेवरती अवलंबून आहे.

राष्ट्रीय स्तरावरती असा प्रयोग झाला तर आपण त्यात सहभागी व्हाल का?

– बघूया ना… आता सुरुवात राज्यात तर झालेली आहे. देशाने त्यातून काही धडा घेतलाय… न घेतलाय… आपल्याला कळलं पाहिजे. ते कळत नाही तोपर्यंत बोलण्यात काय अर्थ आहे.

उद्धवजी धन्यवाद! आपण सगळय़ाच प्रश्नांना मनमोकळेपणानं उत्तरे दिलीत. देशाच्या, राज्याच्या, जनतेच्या मनात जे प्रश्न होते त्याच्यावर आपण बोललात. मला असं वाटतं की, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण जे कार्य हाती घेतलेलं आहे, ते नक्कीच देशाला दिशादर्शक ठरेल… धन्यवाद!

– धन्यवाद! जय हिंद…जय महाराष्ट्र!!

आम्ही अगदीच जसं भारतीय जनता पक्षाने वाट्टेल ते लोक घेतले तसे वाट्टेल ते लोक नाही घेतले. तीसुद्धा लोकं आम्ही चाचपून घेतली आणि विशेषतः जिथे नाइलाजाने म्हणा की शिवसेनेकडे योग्य उमेदवार किंवा… योग्य हे मी कोणत्या अर्थाने म्हणतो… निवडून येण्याच्या अर्थाने… शिवसेना ही कानाकोपऱयात पसरलेली आहे. पण निवडणूक जिंकण्यासाठी काही वेळेला एखादा चेहरा घ्यावा लागतो…

हा काही खेळ नाहीये. 25-30 वर्षे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत होतो. आणि ते केवळ एक राजकारणातली अपरिहार्यता म्हणून नव्हतो. त्याच्यामध्ये जसे प्रमोदजी होते, गोपीनाथजी होते… शिवाय अटलजी, अडवाणीजी, नितीनजीसुद्धा… त्यांच्याबरोबर आमची एक पारिवारिक अशी नाती किंवा ऋणानुबंध निर्माण झाले होते… आणि ते तुटताना यातना तर झाल्याच… नक्की झाल्या… मी आनंदी आहे का? मी रागावलो आहे का? त्यापेक्षा मला या सगळय़ा गोष्टीचं दुःख जास्त झालेलं आहे. तुम्ही कोणाला फसवलंत? जो माणूस तुमच्यापाठी पहाडासारखा उभा राहिला… संकटकाळामध्ये पहाडासारखा उभा राहिला… हिंदुत्वावरची सगळी आक्रमणं होती, धोके होते ते त्यांनी स्वतःवरती घेतले… त्या शिवसेनाप्रमुखांच्या पक्षाबरोबर तुम्ही एकत्र राहू शकत नाही…?

आपली प्रतिक्रिया द्या