राज्यात आता फक्त दोन झोन, रेड झोन वगळता दुसऱ्या झोनमध्ये काही निर्बंध शिथील

5595

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना शासनाने जाहिर केल्या. त्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग केले असून मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका पुणे, सोलापूर, संभाजीनगर, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती हे महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्याव्यरिक्त उर्वरित भाग हा नॉन रेड झोन म्हणून घोषित केला आहे.

पावसाळ्यापूर्वीची कामे, देखभाल, निगा आणि दुरुस्तीसाठी रेड झोनमध्ये दुकाने, मॉल, आस्थापना, उद्योग येथे सकाळी ९ ते सायंकाळी पाच पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल असून या ठिकाणी कुठलेही वाणिज्यिक व्यवहार केले जाणार नाहीत. मात्र नॉन रेड झोनमध्ये बाजारपेठा, दुकाने सायंकाळी पाच पर्यंत उडण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यां-तर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक कुठल्याही जिल्हा अथवा महापालिका प्रशासनाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय स्वतंत्र आदेश काढता येणार नाहीत. आज जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना 22 मे पासून राज्यात लागू होणार आहेत.

पुढील बाबींना बंदी
– आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानवाहतूक यांना बंदी. तथापि वैद्यकीय सेवा तसेच अपवादात्मक परिस्थितील हवाई ॲम्बुलन्स सेवा आणि इतर आवश्यकता वाटल्यास वैद्यकीय सेवांना परवानगी असेल.
– मेट्रो सेवा पूर्णपणे बंद.
– शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विविध वर्ग (क्लासेस) यांना बंदी. ऑनलाईन/ ई- लर्निंग शिक्षणाला उत्तेजन देण्यात येईल.
– ज्या हॉटेलमध्ये अत्यावशक सेवेतील कर्मचारी/ पोलीस/ शासकीय अधिकारी/ आरोग्य कर्मचारी/ काही कारणास्तव अडकली आहेत अशांसाठी तसेच यात्रेकरू आणि विलगीकरण व्यवस्था यांच्यासाठी सुरू राहतील. त्याशिवाय ठराविक बस डेपो, रेल्वे स्थानके आणि एअरपोर्ट येथील कॅन्टीन व्यवस्था सुरू राहील. याव्यतिरिक्त बाकी सर्व उपहारगृहे आणि हॉटेल्स बंद राहतील. मात्र उपहारगृहातील घरपोच व्यवस्था सुरु राहील.
– सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडासंकुल, तरणतलाव, करमणूक संकुले, नाट्यगृहे, बार आणि ऑडिटोरियम, हॉल यांना पूर्णपणे बंदी.
-सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी.
– सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांना बंदी. धार्मिक कारणासाठी एकत्र येण्यावर बंदी.
– कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना व तरतुदी राज्यभरात कायम राहतील.
– अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 वाजता या दरम्यान संचारबंदी असेल. स्थानिक प्रशासन यासंदर्भात सीआरपीसीचे कलम 144  आणि इतर नियमांनुसार आदेश जारी करुन याची कडक अंमलबजावणी करेल.
– 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि 10  वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक किंवा वैद्यकीय  कारण वगळता घरातच थांबणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारचे निकष, उपलब्ध आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक घटक लक्षात घेऊन राज्यातील बाधीत क्षेत्र पुढील प्रमाणे सुनिश्चित करण्यात येत आहे

रेड झोन्स – 
मुंबई महापालिकेसह एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका. पुणे, सोलापूर, संभाजीनगर, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती महापालिका.

रेड झोन नसलेले क्षेत्र (ऑरेंज आणि ग्रीन झोन) – राज्यातील उर्वरित क्षेत्र

कंटेनमेंट झोन्स –
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन संबंधीत महापालिका किंवा जिल्हा प्रशासन हे त्यांच्या भागातील रेड झोन, नॉन रेड झोन तसेच कंटेनमेंट झोन निश्चित करतील. महापालिका क्षेत्रात आयुक्त आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी यांना कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार देण्यात येत आहेत. निवासी कॉलनी, मोहल्ला, झोपडपट्टी, इमारत, इमारतींचा समूह, गल्ली, वॉर्ड, पोलीस ठाण्याचे क्षेत्र, गाव किंवा गावांचा छोटा समूह असे कंटेनमेंट झोनचे क्षेत्र असू शकेल. यापेक्षा मोठे क्षेत्र (संपूर्ण तालुका किंवा संपूर्ण महापालिका क्षेत्र इत्यादी) कंटेनमेंट झोन म्हणून मुख्य सचिवांशी सल्लामसलत करुन जाहीर करता येऊ शकेल. कंटेनमेंट झोन क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णत:  प्रतिबंध करण्यात येत आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

रेड झोनमध्ये पुढील कामे सुरु राहतील
– या आधी  अत्यावश्यक सेवेची जी दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती, ती दुकाने पूर्ववत सुरु राहतील.
– या आदेशाच्या आधी दिलेले निर्देश आणि शिथिलतेचे निकष लक्षात घेऊन व महापालिकेच्या धोरणानुसार अत्यावश्यक सेवा नसणारी दुकाने पूर्ववत सुरु राहतील. परवानगी असल्यास मद्य विक्रीची दुकाने सुरु राहतील.
– या आधी मॉल, उद्योग, दुकाने, प्रतिष्ठाने सुरु ठेवण्याची परवानगी नव्हती.ती आता देण्यात आली आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या कालावधीत यंत्रसामग्री, फर्निचरची दुरुस्ती, देखभाल, निगा राखणे, पावसाळ्यापूर्वीची कामे या सर्व ठिकाणी करता येतील. मात्र याशिवाय कोणतीही (वाणिज्यिक) कामे  करता येणार नाहीत. उत्पादन सुरु करता येणार नाही.
– अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेल्या वस्तू आणि साहित्यासाठी ई-कॉमर्स प्रणालीचा वापर करता येईल.
– या  आधी ज्या औद्योगिक घटकांना सुरु करण्याची परवानगी दिली होती, ते औद्योगिक घटक सुरु राहतील.
– ज्या खासगी व शासकीय बांधकामांना सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती, ती सूरु राहतील. पावसाळ्यापूर्वीची सर्व शासकीय व खाजगी बांधकामे करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
– टॅक्सी, कॅब  आणि समूहाची वाहतूक करणारी साधने (ॲग्रेगेटर), रिक्शा यांना परवानगी नाही. अत्यावश्यक कामासाठी एक आणि त्याशिवाय फक्त दोन अशा व्यक्तींच्या वाहतुकीसाठी चारचाकी वाहनास परवानगी असेल. फक्त एकट्यालाच अत्यावश्यक कामासाठी दुचाकी वापरता येईल.
-आणीबाणीच्या कामासाठी येणारे कर्मचारी (आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा, महापालिका सेवा, एनआयसी, एफसीआय ), त्यांच्या आवश्यकतेनुसार कार्यरत राहतील. संचालनालये आणि आयुक्तालयांसह सर्व शासकीय कार्यालये (उपनिबंधक/ प्रादेशिक परिवहन कार्यालये, उप प्रादेशिक परिवहन कार्यालये सुरु राहतील. अशैक्षणिक कार्यासाठी उपयोगात येणारे विद्यापीठीय आणि महाविद्यालयांचे कर्मचारी, पेपर तपासणी, मूल्यमापन, निकाल आणि ई-कंटेट (आशय) ची निर्मिती करणारे कर्मचारी कार्यालयात येऊ शकतील. मात्र एकूण मनुष्यबळाच्या 5 टक्के किंवा किमान 10 व्यक्ती (जी संख्या अधिक असेल ती.) या प्रमाणातच अशा कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयात राहणे आवश्यक राहील.केंद्र सरकारची कार्यालये ठरवून दिलेल्या निकषानुसार सुरु राहतील.)
– होम डिलिव्हरी (घरपोच सेवा ) करणारी उपहारगृहे आणि स्वयंपाकगृहे सुरु राहतील.
– या आधी जी कामे सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती, ती सुरु राहतील. मात्र सर्व खासगी कार्यालये बंद राहतील.

आपली प्रतिक्रिया द्या