सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकायलाच हवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही होणार आहेत. या निवडणुकांमध्ये शिवसेना नंबर वन पक्ष झाला पाहिजे. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकायलाच हवा. यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाप्रमुखांना दिले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीविषयीची माहिती शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा. समाजोपयोगी कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंका. संपर्पमंत्री, पालकमंत्री यांच्याशी समन्वय वाढवा. एकजुटीने या निवडणुकीना सामोरे जा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले.

कोरोना हद्दपार झाल्याशिवाय शांत बसू नका

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही योजना राबविली जात आहे. ही योजना सक्षमपणे राबविण्यासाठी सरकारी यंत्रणेसोबत काम करा. राज्यातील रुग्णांचा आकडा कमी होत आहे. त्यामुळे कोरोना हद्दपार झाल्याशिवाय शांत बसू नका, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

या बैठकीला शिवसेनेचे राज्यभरातील जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई,  मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा लाभ तळागाळातील जनतेला व्हायला हवा

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आज सत्तेवर आहे. त्याचा लाभ तळागाळातील जनतेला व्हायला हवा. सरकारने जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षसंघटना कार्यक्षम करा. विभागाविभागातील जनतेची कामे करण्यासाठी पुढाकार घ्या. लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित मंत्र्यांना भेटा व जनतेची कामे करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.