चार्टर्ड अकाउंटट, कंपनी सेक्रेटरीज यांच्यासाठी ‘एसओपी’ सादर करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

चार्टर्ड अकाउंटट आणि कंपनी सेक्रेटरीज यांनी कामाच्या वेळांची विभागणी आणि कार्यप्रणालीत बदलाची एसओपी सादर करावी. जेणेकरून या दोन्ही क्षेत्रातील व्यावसायिकांना कामकाज करणे सुलभ होईल. तसेच ही एसओपी इतरांनाही मार्गदर्शक ठरेल, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले. या दोन्ही क्षेत्रातील व्यावसायीकांच्या संघटनांच्या पदाधिकारी सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड तसेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटट ऑफ इंडियाचे अध्यक्ष निहार जंबुसरीया, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाचे अध्यक्ष नागेंद्र राव, पवन चांडक, दुर्गेश काबरा, देवेंद्र देशपांडे, देबाशीष मित्रा, नितीन दोशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव हा अप्रिय निर्णय घ्यावा लागला आहे. याची पुर्वकल्पना मी वारंवार देत आलो आहे. कोरोना वाढू नये याची खबरदारी घ्यावी लागेल. त्यासाठी कोरोना रोखण्यासाठी उपाय कराव्याच लागतील असे सांगितले होते. त्यामुळे हा लॉकडाऊन सरकारने नाही केला. तर कोरोनाने केला आहे. हे लक्षात घ्या. याचा परिणाम सगळ्यांवरच म्हणजे विकास कामांवर, लोकांच्या रोजीरोटीवर होतो याची जाणीव आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर संपवायची आहे. पण मध्यंतरी आपण बेफिकीर झालो. त्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आता उभ्या केलेल्या सुविधा अपुऱ्या पडतील, ऑक्सीजनचा तुटवडा होईल अशी भिती आहे. रुग्णसंख्या वाढ रोखण्याठीच हे असे निर्बंध आणावे लागले आहेत.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश असे, बँका, खासगी कार्यालये यांनी वेळांची विभागणी करून वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावे. वर्क फ्रॉम होम कार्यपद्धती अवलंबावी. लोकल सुरु करतानाही ‘पिक’ हा शब्द काढून टाका असे सांगितले होते. पिक अवर ऐवजी, चोवीस तास का नको. चोवीस तासांच्या विभागणीत काम करून गर्दी आणि विविध यंत्रणांवरील ताण टाळणे शक्य आहे. शिस्त पाळून काम करा. कामाच्या ठिकाणाऱ्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी घ्या. त्यांच्या खाण्याची आणि येण्या-जाण्याची व्यवस्था यासाठी नियोजन करा. यासाठी चांगली एसओपी तयार करून ती सादर करण्यात यावी.

यावेळी कंपनी सेक्रेटरीज आणि चार्टर्ड अकाउंटट संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी संकटामागून संकटे येत असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शासन उत्कृष्टपणे काम करत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. शासनाच्या कोरोना नियंत्रणाच्या आणि अर्थचक्राला गती देण्याच्या प्रयत्नांत खांद्याला खांदा लावून काम करू असेही या सर्वांनी नमूद केले. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्ही सर्व माझी ताकद आहात. आपण सर्व एक आहोत. आपण सर्व एकजुटीने या संकटावर मात करू असा विश्वासही व्यक्त केला.

आर्थिक वर्ष समाप्तीची कामे, कर भरणा, परतावे आणि कंपनी कायद्याप्रमाणे अनेक गोष्टींची पुर्तता करण्यासाठी काम करावे लागणार आहे. त्यासाठी चांगली कार्यप्रणाली (एसओपी) तयार करून कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून कामकाज केले जाईल, असेही या सर्वांच्यावतीने सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या