धोका टळला नाही उलट वाढला! कडक निर्बंध लावावेच लागतील; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युरोपातील देशांत लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होताना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेने ही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी जनतेनेही कोविड नियम पाळले नाहीत तर नाइलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.

कोरोनाविषयीची राज्यातील परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठय़ा प्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय, अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिह्याने त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस् व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रित करावे.

लसीकरणाचा वेग वाढवा

लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्य आज देशात एक नंबरवर असले तरी आणखी प्रभावीपणे हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचा नवीन विषाणू आणि औषधोपचाराची पद्धती यासंबंधीचे मार्गदर्शन टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावे.

अग्निसुरक्षा, ऑक्सिजन साठा तपासा

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरू केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची  अग्निसुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पिटलमधील सोयी-सुविधा, ऑक्सिजन साठा व पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी.  व्हेंटिलेटर्सची, आयसीयू व ऑक्सिजन बेडस्ची संख्या वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

लोकांना कारण सांगून लॉकडाऊन करा

ज्या जिह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा, पण ते लावताना अचानक लावू नका. लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱयांना दिल्या.

अधिक लसीच्या पुरवठय़ासाठी केंद्राकडे मागणी करा – देशमुख

गावात लसीकरणाची पूर्वतयारी झाली का याची शहानिशा केली जावी तसेच लसीकरणाचा वेग वाढवताना राज्याला केंद्राकडून मोठय़ा संख्येने लस उपलब्ध होण्यासाठी केंद्राकडे मागणी करावी, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले. त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी त्याची मागणी उत्पादकांपर्यंत वेळेत पोहोचण्याची गरजही व्यक्त केली. शाळा आणि महाविद्यालये सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि प्राध्यापकांचे लसीकरण पूर्ण केले जावे, ट्रान्सपोर्ट व्यवस्थेत काम करणाऱया लोकांनाही लस देण्यात यावी, असेही ते म्हणाले.

नियमांचे पालन होतेय की नाही काटेकोरपणे बघा

आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू परंतु डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱयांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पी.ची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी,  गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत, अशा सूचनाही  मुख्यमंत्र्यांनी दिल्या.