
नेहमीप्रमाणे यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका संपलेला नाही, गर्दी करता येणार नाही, मिरवणुका काढता येणार नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता बाळगूनच आणि योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागणार आहे. तेव्हा सामाजिक भान ठेवत समाजोपयोगी उपक्रम राबवून साधेपणाने उत्सव साजरा करा. जगासमोर उत्सवांचा नवा आदर्श निर्माण करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
कोरोनाच्या संकटकाळात अवघ्या दोन महिन्यांवर गणेशोत्सव आला आहे. या उत्सवातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात आज मंत्रालयात गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, हे खरे आहे की गणेशोत्सवात साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे त्या चौकटीत राहूनच हा उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवाची परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ पण सामाजिक भान ठेवावेच लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव साजरा करू असेही मुख्यमंत्री म्हणाले. गणेश मंडळांच्यामार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा आपण विचार करू व हा उत्सव साजरा करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्रीद्वय सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार, आमदार, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन व इतर वरिष्ठ अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुण्यातही गणेशोत्सव साध्या पद्धतीनेच
तासनतास चालणाऱ्या मिरवणुकांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मंडळांकडून तसे आश्वासन देण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी उत्सवाची परंपरा कायम ठेवून स्वरूपात बदल करावे लागतील. प्रत्येकाने घरातूनच गणरायाचे पूजन करावे, अशी जनजागृती करण्याचे आवाहन केले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अशोकराव गोडसे यांनी शासन जो निर्णय देईल, त्यानुसार आम्ही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करू. गणेशोत्सव मंडळे सरकारसोबत आहेत, असे आश्वासन दिले.
गणेशोत्सव मंडळांना धन्यवाद
पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे, याबद्दल तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे अशी ग्वाही राज्यातील गणेशोत्सव मंडळांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. शिर्डी सिद्धिविनायक व या सारख्या संस्थांनी त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जी मदत केली तसेच सामाजिक उपक्रम राबवले त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.


























































