शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्याचे 72 टक्के काम पूर्ण

‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे 72 टक्के काम पूर्ण झाले आहे. महामार्गाचा हा टप्पा लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. त्याचबरोबर कोकण सागरी किनारा महामार्ग चार पदरी करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मुंबई-नागपूरला जोडणारा ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सी लिंक यासह प्रस्तावित कोकण सागरी महामार्ग व कोकण एक्प्रेस वे या प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला.

ऑगस्टमध्ये पुन्हा आढावा

नागपूर ते शिर्डी या टप्प्यातील उर्वरित कामे वेगाने पूर्ण करावी. या मार्गाच्या परिसरात पेट्रोलपंप, वाहनचालकांसाठीच्या सुविधा निर्माण करा. महामार्गावरील इतर टप्प्यांची कामेही वेगाने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. या कामांचा ऑगस्टमध्ये पुन्हा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कोकणाचा विकास करणारा महामार्ग

कोकण सागरी किनारा महामार्ग हा कोकणासाठी महत्त्वपूर्ण मार्ग आहे. हा महामार्ग चार पदरी करावा. त्यामुळे वाहतूक सुरक्षित होईल व पर्यटक वाढीसाठीही उपयोग होईल. या महामार्गावरील खाडींवरील सर्व पुलांचे काम प्राधान्याने हाती घ्यावे. भूसंपादनाची कमीत कमी गरज भासेल, अशा प्रकारे कामाची आखणी करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

वांद्रेवर्सोवा सी लिंक मार्गाचा आढावा

मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. हे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कोकण द्रुतगती मार्गाच्या आरेखनाचा सविस्तर आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला.

वनीकरणाला प्राधान्य

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूने वनीकरण करण्यात यावे. या महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रे कमी करून हा मार्ग अपघातविरहित करण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

ठाणेनाशिकची कामे वेळेत

समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन झाले आहे. समृद्धी महामार्गाच्या ठाणे व नाशिक भागातील कामेही लवकर पूर्ण करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी या प्रकल्पांचे सादरीकरण केले.

आपली प्रतिक्रिया द्या