जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे, मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही – मुख्यमंत्री

4817

जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे. कोरोना सारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा मात्र स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी असेही ते म्हणाले.

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीला मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू आमदार कपिल पाटील, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत रघुनाथ माशेलकर, डॉ अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ञही उपस्थित होते.

मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही
शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये. ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्यांचे शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येईल. दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात. ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरू करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच आॅनलाईन शिक्षण सुरू करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

’10 वर्षांत प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी तब्बल अडीच तीन तास शिक्षण विभागाचे प्रश्न ऐकून घेतले तसेच ते सोडविण्यासाठी आश्वस्त केले’, आमदार कपिल पाटील यावेळी म्हणाले. या बैठकीत विना अनुदानित संस्थांमधील शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे यावरही चर्चा झाली.

आपली प्रतिक्रिया द्या