महागाईचा चटका, CNG आणि PNG च्या किमतींमुळे खिशाला बसणार फटका; ऑक्टोबरपासून किंमती वाढण्याची शक्यता

नैसर्गिक वायूच्या किमतींच्या संदर्भात या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुनरावलोकन बैठक होईल. या पुनरावलोकनानंतर नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही वाढ नैसर्गिक वायूंच्या दरांसंदर्भातील आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ असू शकते, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं काही वृत्तसंकेत स्थळानी दिली आहे.

वीज, खते आणि वाहनांसाठी सीएनजी निर्मितीच्या कामात नैसर्गिक वायूचा वापर होतो. देशात तयार होणाऱ्या गॅसची किंमत सरकार ठरवते. 1 ऑक्टोबर रोजी गॅसच्या दरात सुधारणा होऊन दरवाढ होण्याची शक्यता आहे.

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC) मधून उत्पादित केलेल्या गॅससाठी दिलेला दर 6.1 डॉलर प्रति इकाई (मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट) वरून 9 डॉलर प्रति युनिटपर्यंत वाढू शकतो. आतापर्यंतचा हा सर्वोच्च दर असणार असल्याचे बोलले जात आहे.

आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे एप्रिल 2019 पासून नैसर्गिक वायूच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता दरवाढ झाल्यास 2019 पासून ही तिसरी वाढ असणार आहे. सरकार दर सहा महिन्यांनी गॅसची किंमत ठरवते.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार, नियोजन आयोगाचे माजी सदस्य किरीट एस पारेख यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अंतिम ग्राहकांसाठी गॅसची वाजवी किंमत सुचवा असे निर्देश या आधीच देण्याचे सांगण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे.