बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी तटरक्षक दलाची बारीक नजर

बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर तेथील नागरिक शेजारील देशांमध्ये घुसखोरी करत असल्याचे चित्र आहे. हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असून समुद्रमार्गेही बांगलादेशी नागरिक हिंदुस्थानात येऊ शकतात. हे लक्षात घेऊन हिंदुस्थानच्या समुद्रात तटरक्षक दलाकडून बारीक नजर ठेवण्यात येत आहे. समुद्रातील गस्त वाढवण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

मासेमारी करणाऱ्या नौकांवरही तटरक्ष दलाचा वॉच असून हिंदुस्थानातील मच्छीमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत समुद्रमार्गे घुसखोरी झालेली नाही. परंतु, ही शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे तटरक्षक दल अलर्ट झाले आहे. ओडिशा सरकारनेही आपल्या 480 किलोमीटर लांब समुद्र किनाऱ्यावर सतर्कता वाढवली आहे. बांगलादेशच्या समुद्रकिनाऱ्यापासून जवळपास 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या ओदिशातही घुसखोरी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्याने अतिरीक्त सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याचे वृत्त आहे.