
मुंबई महानगरपालिकेने बांधलेला आणि मुंबईला वेगवान बनवणारा कोस्टल रोडवर 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 24 तास वाहतूक सुरू होणार आहे. या मार्गावरील 5.25 किमी लांबीची मोकळी जागा उपलब्ध झाली असून या ठिकाणी मुंबईकरांना बिनधास्त फिरता येणार आहे. शिवाय या मार्गावरील चार पादचारी भुयारी मार्गांचे कामही पूर्ण झाले असून हे मार्ग आजपासून सुरू झाले आहेत.
पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या आणि दक्षिण मुंबईचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टलमधील अद्ययावत सुविधांचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण झालेले विहार क्षेत्र आणि पादचारी भुयारी मार्ग हे नागरिकांसाठी 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.30 वाजेपासून खुले करण्यात येणार आहेत.
नव्या सुविधांमध्ये भुयारी मार्ग क्रमांक 4 येथे येण्यासाठी भुलाभाई देसाई मार्गावरील आकृती पार्किंग इमारत येथून प्रवेश देण्यात आला आहे. भुयारी मार्ग क्रमांक 6 येथे येण्यासाठी वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली जंक्शन) येथून प्रवेश देण्यात आला आहे. भुयारी मार्ग क्रमांक 11 येथे येण्यासाठी खान अब्दुल गफार खान मार्गावरील वरळी दुग्ध शाळेसमोर प्रवेश देण्यात आला आहे. तर भुयारी मार्ग क्रमांक 14 येथे येण्यासाठी वरळीतील बिंदुमाधव ठाकरे चौक या ठिकाणाहून प्रवेशाची सोय आहे. या सर्व ठिकाणांहून भुयारी मार्गात जाण्यासाठी पायऱ्या तसेच उतार मार्ग (रॅम्प) ची व्यवस्था आहे. जेणेकरून सायकलस्वार व दिव्यांग येथे सहज प्रवेश करू शकतात.
सायकल ट्रॅकसह दिव्यांगांना व्हिलचेअर सुविधा
n नागरिकांसाठी विरंगुळा तसेच शारीरिक तंदुरुस्तीसाठी पालिकेने विहार क्षेत्रावर विविध सोयीसुविधा दिल्या आहेत. विहार क्षेत्रावर सायकल ट्रक तयार करण्यात आला आहे.
n ठिकठिकाणी हिरवळ विकसित करण्यात आली असून विविध फुलझाडे, शोभेची झाडे, या विहार क्षेत्राकडे जाण्यासाठी उभारलेल्या भुयारी पादचारी मार्गावर दिव्यांगांसाठी स्वतंत्र रॅम्प तयार करण्यात आला आहे.