कोस्टल रोड सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला तरी संध्याकाळी 6 नंतर इतर कामांसाठी तो बंद केला जातो. असे असताना काही व्हीआयपीज आणि मंत्र्यांच्या ताफ्याला वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्ग मोकळा करून दिला जातो. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी हा मार्ग बंद ठेवता मग व्हीआयपीज/मंत्र्यांची कोस्टल रोडवर मक्तेदारी आहे का, असा सवाल करून हा मार्ग सर्वसामान्य मुंबईकरांसाठीही खुला करा, अशी मागणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
कोस्टल रोडवरून एका व्हीआयपीज-मंत्र्यांच्या ताफ्याला जाण्यासाठी रविवार, 16 जूनला रात्री 9 वाजता वरळी ते मरीन ड्राईव्ह हा वाहतुकीसाठी बंद केलेला मार्ग वाहतूक पोलिसांनी खुला केला. ताफा गेल्यानंतर पुन्हा हा मार्ग बंद करण्यात आला. यावर आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून धारेवर धरले आहे. याबाबत आज ‘एक्स’वर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पालिका आयुक्त कोस्टल रोडवर व्हीआयपीज संस्कृती का जोपासत आहेत? आम्ही बांधून पूर्ण केलेला कोस्टल रोड केवळ व्हीआयपीजसाठी बांधण्यात आलेला नाही तर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आहे. त्या दिवशी कोणत्या व्हीआयपीजने रात्री बंद असलेला कोस्टल रोड खुला करायला लावला त्या व्हीआयपीजची नावे उघड करू नका, पण सर्वसामान्यांसाठी कोस्टल रोडचे दरवाजे खुले करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.