पुन्हा गुजरात! पोलिसांकडून ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश; 5000 कोटींचे कोकेन जप्त, 5 जणांना अटक

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले आहे. गुजरातच्या मुंद्रा बंदरासह किनारपट्टी भागामध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले आहे. अंकलेश्वर येथे दिल्ली आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 5 हजार कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून 5 जणांना अटक केली आहे.

दिल्लीतील महिपालपूरमध्ये काही दिवसांपूर्वी 6 हजार कोटींचे कोकेन पकडण्यात आले होते. 2 ऑक्टोबर रोजी महिपालपूर येथून 562 किलो कोकेन, तर रमेशनगर येथून 208 किलो कोकेन जप्त करण्यात आले होते. या ड्रग्ज तस्करीची व्याप्ती आता वाढत असून दिल्ली पोलीस आणि गुजरात पोलिसांनी अंकलेश्वर येथे संयुक्त कारवाई करत 518 किलो कोकेन जप्त केले. बाजारात याची किंमत 5000 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीत पकडण्यात आलेल्या 700 किलो कोकेन संदर्भात तपास करताना हे ड्रग्ज अंकलेश्वर येथील अवकार दुर्ग्स लिमिटेड कंपनीतून आल्याचे समोर आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांचे विशेष पथक रविवारी रात्री गुजरातमध्ये पोहोचले. येथे गुजरात पोलिसांच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी कंपनीवर छापा टाकला आणि गोदामातून कोकेनचा साठा जप्त केला. या कारवाईदरम्यान 5 जणांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. दुबई आणि यूकेतील आंतरराष्ट्री सिंडिकेटशी आरोपींचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगानेही चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तत्पूर्वी दिल्ली पोलिसांनी 2 ऑक्टोबर रोजी महिपालपूर येथून 562 किलो कोकेन आणि 40 किलो हायड्रोपोनिक मारिजुआना जप्त केले होते. याची किंमत 5620 कोटी रुपये असून चौघांना अटक करण्यात आली होती. तर अन्य दोन आरोपींना अमृतसर आणि चेन्नईतून बेड्या ठोकण्यात आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी 2080 कोटींचे 208 किलो कोकेन जप्त केले होते. याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील हापूड येथून एकाला अटक करण्यात आली होती.