कॉफीत तूप घालून प्या .. जाणून घ्या फायदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या काही जणांनी आहारामध्ये तूप घातलेल्या कॉफीचाही समावेश केला आहे . कॉफीमध्ये तूप? हो, हे अगदी खरं आहे. कॉफीमध्ये एक किंवा दोन चमचे तूप मिसळून तुपाच्या कॉफीचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जाणून घेऊया ‘तूप घालून कॉफी’चे आरोग्याला होणारे फायदे

तूपयुक्त कॉफी आणि बुलेट कॉफी हल्ली ट्रेंडमध्ये आहे. कित्येक सेलिब्रिटी आणि आहारतज्ज्ञांनी आपल्या डाएटमध्ये या तूपयुक्त कॉफीचा समावेश केला आहे. तूपयुक्त कॉफीचे फायदे केवळ डाएटपर्यंतच मर्यादित नाहीत. काही लोकांना नॉर्मल कॉफी पचण्यास अतिशय जड जातं. त्यामुळे अशा लोकांनी रिकाम्या पोटी कॉफी पिणं टाळावं. पण तूपयुक्त कॉफी प्यायल्यास तुम्हाला पचनाचा कोणताही त्रास होणार नाही. कारण तुपामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या कमी होते.

तुपाची कॉफी पिण्याचे फायदे
तुपामध्ये ब्युटिरिक अ‍ॅसिड आणि ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचे घटक आहेत. हे घटक अन्ननलिकेचं कार्य आणि चयापचयाची क्षमता (Metabolism) सुधारण्याचे कार्य करतात. कॉफीमध्ये तूप मिसळून तुम्ही सेवन केल्यास शरीराला दुप्पट फायदे मिळतील. वजन कमी करण्यासाठी तुम्ही या कॉफीचा आधार घेऊ शकता. कारण या कॉफीमुळे भूक लागण्याचं प्रमाण कमी होतं. शिवाय शरीराला ऊर्जा देखील मिळते. यामुळे दिवसभर तुम्हाला थकवा जाणवत नाही.

त्वचेसाठी तूप गुणकारी
नितळ आणि सुंदर त्वचेसाठी तुपाचे सेवन केल्यास भरपूर फायदे मिळतात. कोरड्या आणि फाटलेल्या ओठांपासून ते त्वचेवर नैसर्गिक चमक यावी, यासाठी तुपाचे सेवन करणं उपयुक्त ठरते. महत्त्वाचे म्हणजे तुपामध्ये सूज आणि जखम भरून काढण्याचेही गुणधर्म आहेत.

आहारतज्ज्ञांच्या मते बटर आणि एक चमचा तुपामध्ये शरीरास आवश्यक असणाऱ्या पोषकतत्त्वांचं प्रमाण भरपूर आहे. दिवसभर कार्य करण्यासाठी शरीरात ऊर्जा टिकून राहावी, यासाठी सकाळचा नाश्ता करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. पण कामाच्या नादात बऱ्याच जणांना नाश्ता करणे शक्य होत नाही. अशा वेळेस पर्याय म्हणून तुम्ही तूपयुक्त कॉफी पिऊ शकता. बटरच्या तुलनेत तूप आरोग्यासाठी लाभदायक आहे. तुपामध्ये कॅलरीचे प्रमाण मुबलक आहे. त्यामुळे ही कॉफी प्यायल्यानं तुमच्या शरीराला दिवसभरासाठी पुरेशी ऊर्जा मिळू शकते.

तुपातील पोषकतत्त्वे-
कॅलरी – १२०
फॅट्स – १७ ग्रॅम
सॅच्युरेडेट फॅट्स – १० ग्रॅम
अनसॅच्युरेडेट फॅट्स- ७ ग्रॅम
कार्बोहायड्रेट्स – ०
सोडियम – ९० मिलीग्रॅम
साखर -०
फायबर – ०
प्रोटीन – ०
कोलेस्ट्रॉल २५ मिलीग्रॅम