
राज्याचा अनेक भागांमध्ये थंडी प्रचंड वाढली असताना पुढील दोन दिवस गारवा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱया थंड वाऱयांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. तर दोन दिवसांनंतर तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होईल, असे मुंबई हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी दिली.
उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्व विभागात थंडी चांगलीच वाढली आहे. यामध्ये निफाड येथे पारा 5.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला आहे. अहिल्यानगर येथे 7.3 अंश सेल्सिअस तर नाशिकमध्ये 7.4 अंश सेल्सिअस इतकी पाऱयाची नोंद झाली. राज्याच्या अनेक भागांत हीच स्थिती असून तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदवले जात आहे. यामध्ये बीड, जळगाव, मालेगाव, मोहोळ, तुळजापूर, अमरावती, गोंदिया आणि नागपूरमध्ये 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदवले गेले.
सातपुडय़ात थंडीने हाडे गोठण्याची वेळ
नंदुरबार जिल्ह्यातील पर्वतरागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढतच आहे. विशेषतः सातपुडय़ातील अतिदुर्गम व डोंगराळ भागात अक्षरशः दवबिंदू गोठले असून बर्फाची चादरच पसरली आहे. यामुळे हाडेही गोठण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय पिकावर पांढऱया रंगाचा थर दिसत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.






























































