हुडीबाबा! 29 जानेवारीनंतर महाराष्ट्र गारठणार, थंडीच्या लाटेमुळे तापमानात होणार मोठी घट

गेल्या आठवड्यात मिळालेल्या थोड्याशा दिलाशानंतर आता संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे जी 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहील, असे IMD पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ अनुपम कश्यपी यांनी सांगितले. तसेच 30 जानेवारीपासून तापमानात लक्षणीय घट नोंदवली जाईल, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

पुणे हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती (थ्रेशोल्ड 10 अंश) दिसून येईल, तर मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते.

एक वेस्टर्न डिस्टर्बन्स अफगाणिस्तानवर स्थित आहे आणि पूर्वेकडे सरकत आहे. त्याच्या प्रभावाखाली, नैऋत्य राजस्थानवर एक चक्रीवादळ घोंगावत आहे.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार 27 जानेवारीनंतर आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्सची शक्यता आहे.

पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने किमान तापमानात किरकोळ वाढ होईल, परंतु दिवसाच्या तापमानात अंशत: घट होऊ शकते.