आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे- जिल्हाधिकारी

पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील अनेक दिंड्यासह परजिल्ह्यातील दिंड्या आपल्या जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी पंढरपुरकडे जातात. या दिंड्यातील वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, राहण्याची व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. आषाढी वारीच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, संत निळोबाराय पालखीचे अध्यक्ष अशोकराव सावंत, मानाच्या पालख्यांचे प्रमुख तसेच जिल्ह्यातील दिंड्यांचे प्रमुख  उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील अनेक दिंड्या आपल्या जिल्ह्यातून जातात. या दिंड्यामधील वारकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत.  दिंड्यांच्या मुक्कामाची ठिकाणे ठरलेली आहेत. ज्या गावात अथवा शहरामध्ये या दिंड्या मुक्कामी थांबणार आहेत त्या ठिकाणी वारकऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात यावी. वारकऱ्यांना दिंडी मार्गावर शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या. दिंड्यामधून हजारो वारकरी पायी चालत असतात. अश्या वेळी वारकऱ्यांचे आरोग्य चांगले राहील यादृष्टीने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तसेच जागोजागी आरोग्य पथके तैनात ठेवण्यात यावीत. या पथकामध्ये पुरेश्या प्रमाणात मनुष्यबळ तसेच औषधीसाठा उपलब्ध ठेवण्यात यावा. आवश्यकतेनुसार रुग्णास तातडीने उपचार मिळावेत यासाठी अधिक प्रमाणात रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात याव्यात.  प्रथमोपचार किट तयार करून ती प्रत्येक दिंड्यामध्ये देण्यात यावी.आरोग्य सुविधेमध्ये कुठलीही उणीव भासणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित विभागांना दिल्या.
वारकरी पायी चालत असलेल्या मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दिंड्यासोबत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. तसेच दिंड्या ज्या ठिकाणी मुक्कामी राहतील तेथेही पोलीस कर्मचारी उपस्थित राहतील दृष्टीने नियोजन करण्यात यावे. सध्या पावसाचे दिवस आहेत. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याचे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे या पाण्याचा निचरा होऊन पावसाच्या पाण्यापासनु वारकऱ्यांचे संरक्षण होण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाण्याचे टँकर उपलब्ध करुन देण्यात यावेत. जिल्ह्यातील दिंड्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गाची आवश्यकतेनुसार डागडुजी, खड्डे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सुचनाही संबंधित विभागाला दिल्या.
मानाच्या पालखी प्रमुखांनी केला जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार
गतवर्षी  आषाढी वारीमध्ये प्रशासनाने वारकऱ्यांना अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल संत निळोबाराय पालखीचे अध्यक्ष अशोकराव सावंत, राजराजेश्वरी दिंडी प्रमुखांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा सत्कार केला. तसेच सर्व दिंडी प्रमुखांनी वारकऱ्यांचा विमा काढण्यात यावा. वारकऱ्यांच्या वाहनांना पासेसचे वितरण अहमदनगर येथुन व्हावे. वारकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा वेळेत उपलब्ध होण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशा मागण्याही जिल्हाधिकाऱ्यांकडे यावेळी दिंडी प्रमुखांनी केल्या. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.