
सामना ऑनलाईन, तिरुवनंतपुरम
तिरुवनंतपुरम येथील एका शैक्षणिक संस्थेने एका जोडप्याला प्रेमसंबंध असल्याने कॉलेजमधून काढून टाकले. केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणी शनिवारी निकाल देताना म्हणाले की प्रेम संबंध असणार्या जोडप्याला कॉलेजमधून काढण्याचा कुठलाच हक्क संस्थेला नाही. प्रत्येक नागरिकाला खाजगी आणि स्वतंत्र आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. शैक्षणिक संस्था त्यावर बंदी आणून शकत नाही असे खडे बोल उच्च न्यायालयाने सुनावले.
केरळमध्ये सीएचएमएम कॉलेज फॉर ऍडवान्स स्टडीज या संस्थेतील बीबीएची एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यात प्रेमसंबंध होते. या एकमेव कारणामुळे २०१७ साली संस्थेने या दोघांना कॉलेजमधून काढून टाकले. दोघांचे कुटुंबियसुद्धा त्यांच्या प्रेमसंबंधाविरोधात होते. घरच्यांचा विरोध पत्करून दोघे घरातून पळूनही गेले होते. मुलीच्या आईने नंतर पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीवरून दोघांना मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्यात आले. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी तक्रार मागे घेतली. कॉलेजने जेव्हा या दोघांना काढून टाकले तेव्हा हे प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने या प्रेमी युगुलाची बाजू घेत शैक्षणिक संस्थेची कानउघडणी केली.
न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले की “प्रेम हे आंधळं असतं. प्रेम करणे हा मानवी स्वभाव आहे. ही बाब व्यक्तीच्या स्वातंत्र्याशी निगडीत आहे.” तसेच शैक्षणिक संस्था अशा प्रकरणी कुठलीच कारवाई करू शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यांच्यात प्रेमसंबंध असल्यामुळे त्यांच्या शिक्षणात कुठलीच अडचण निर्माण होऊ शकत नाही असेही न्यायालयाने नमूद केले. यासगळ्या प्रकरणानंतर विद्यार्थ्याने कॉलेज बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कॉलेजने आपले कागदपत्र परत करावे अशी मागणी या विद्यार्थ्याने केली आहे. न्यायालयाने विद्यार्थिनीला कॉलेजमध्ये परत प्रवेश देण्यासाठी आणि विद्यार्थ्याचे कागदपत्र परत करण्यासाठी संस्थेला दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे.

























































