टाटा नॅनोने महिंद्रा थारला दिले धोबीपछाड, विचित्र अपघाताची नेटकऱ्यांनी उडवली थट्टा

महिंद्रा थार ही हिंदुस्थानातील मजबूत कारपैकी एक म्हणून ओळखली जाते. ही गाडी तिच्या गँगस्टर आणि मस्क्युलर लुकमुळे रस्त्यावर चालताना सर्वात हटके वाटते. मोठी चाकं, पावरफुल इंजिन आणि मजबूत बिल्ड क्वालिटीमुळे आपण या गाडीमध्ये ऑफरोडिंगही करू शकतो. इतर गाड्या थारला धडकल्यानंतर त्या गाड्यांची अवस्था बिघडते. मात्र नुकताच महिंद्रा थार आणि टाटा नॅनो यांचा एक अपघात सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

छत्तीसगडच्या दुर्गमध्ये महिंद्रा थार आणि टाटा नॅनो यांच्यात अपघात झाला. मात्र दोन्ही गाड्यांच्या अपघातानंतर महिंद्रा थारची जी अवस्था झाली ते पाहून सर्वांना धक्काच बसला. हिंदुस्थानातील सर्वात स्वस्त कार अशी टाटा नॅनोची ओळख आहे. मात्र कॉम्पॅक्ट डिझाइन आणि लूकमुळे तिची अनेकदा थट्टा उडवली जाते. मात्र महिंद्रा थार टाटा नॅनोला धडकल्यानंतर थेट उलटली. छत्तीसगडच्या दुर्गमध्ये रस्त्यावर उलटलेली थार पाहिल्यानंतर दोन्ही गाड्यां मधील मजबूत गाडी कोणती हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा थार वेगात एक जंक्शन ओलांडत असताना पलीकडून टाटा नॅनो आली आणि थारला धडकली. या धडकेत थार जागीच उलटली. या अपघातात टाटा नॅनोचे थोडे नुकसान झाले मात्र ती चारही चाकांवर उभी होती. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

‘सेफ कार्स फॉर इंडिया’ उपक्रमांतर्गत, ग्लोबल NCAP ने महिंद्रा थारला 4 स्टार सुरक्षा रेटिंग प्रदान केले आहे. या SUV ने प्रौढांच्या सेफ्टीमध्ये 17 पैकी 12.52 गुण मिळवले आणि लहान मुलांच्या संरक्षणात 49 पैकी 41.11 गुण मिळवले आहेत. मात्र असे असूनही थार पालटली कशी असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.