
दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये सोमवारी एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. कोलंबियन हवाई दलाचे सी-१३० हरक्युलस हे लष्करी वाहतूक विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले. या विमानात ११० हून अधिक सैनिक आणि क्रू मेंबर्ससह एकूण १२५ जण प्रवास करत होते. या भीषण अपघातात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान कोलंबियाच्या दक्षिण भागात असलेल्या पुएर्तो लेगुइझामो येथून उड्डाण करत होते. उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच वैमानिकाचा विमानावरचा ताबा सुटला आणि हे अजस्त्र विमान ॲमेझॉनच्या घनदाट जंगलात कोसळले. विमान जमिनीवर आदळताच त्याला भीषण आग लागली आणि परिसरात धुराचे लोट पसरले.
कोलंबियाचे संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. लष्करी तुकड्या आणि बचाव पथके तातडीने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने घटनास्थळी रवाना झाली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत ७१ जणांना विमानातून बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित सैनिकांच्या स्थितीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.




























































