घरांच्या सुधारित ऍग्रीमेंटसह एकत्रित भाडेही मिळणार, शिवसेनेमुळे प्रभादेवीच्या कलकत्तावाला चाळीच्या रहिवाशांना दिलासा

प्रभादेवीच्या कलकत्तावाला चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना नेते अनिल देसाई, एसआरए सीईओ, विकासक आणि रहिवाशांमध्ये झालेल्या बैठकीत रहिवाशांच्या सर्व मागण्या विकासकाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांना घरांच्या तोडकामाआधी सुधारित अॅग्रीमेंटसह एकत्रित भाडे मिळणार आहे. भाडय़ात वाढ करून ते 25 हजार करण्यात येणार असून अपात्र भाडेकरूंनाही एक वर्षाचे भाडे दिले जाणार आहे. उर्वरित रहिवाशांबरोबरही अॅग्रीमेंटही तातडीने करण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून रहिवाशांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

कलकत्तावाला चाळीच्या पुनर्विकासासंदर्भात विविध अडचणींवर तोडगा निघावा व तेथील रहिवाशांना योग्य न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकाराने एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या दालनात आज विकासक व रहिवासी यांच्यात बैठक झाली. यावेळी उपनेत्या विशाखा राऊत, विभागप्रमुख महेश सावंत, दिनेश बोभाटे, उपसचिव प्रवीण महाले, शाखाप्रमुख अजित कदम, एसआरएचे अधिकारी तसेच रहिवासी उपस्थित होते.

काय आहे प्रकरण…

प्रभादेवीमधील सिद्धिविनायक मंदिरामागील गल्लीत खासगी भूखंडावर 54 रहिवाशांची बैठी घरे असलेली कलकत्तावाला ही 100 वर्षे जुनी चाळ आहे. 1987 साली या चाळीचा समावेश एसआरएमध्ये करण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी माईटी इंजिनीअर कॉण्ट्रक्टर्स अॅण्ड डेव्हलपर्स या विकासकाने रहिवाशांना एसआरए प्रकल्पाअंतर्गत घरे देण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार ओम सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात आली, मात्र विकासकाकडून रहिवाशांना देण्यात येणाऱया सुविधांबाबत त्यात कोणत्याही गोष्टींची स्पष्टता नव्हती. त्यावरून हे प्रकरण न्यायालयात गेल्याने पुनर्विकासाचे काम बरीच वर्षे रखडले होते.