विमानात अर्णब गोस्वामीशी भिडला कुणाल कामरा, विमान कंपन्यांकडून सहा महिन्यांची बंदी

1059

पॉलिटिकल कॉमेडियन कुणाल कामरा पत्रकार अर्णब गोस्वामीशी विमानात भिडला आहे. विमान प्रवासादरम्यान कुणालने अर्णब गोस्वामीवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. त्याचा व्हिडीओही कुणालने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. विमानात गैरवर्तणूक केल्याप्रकरणी इंडिगो विमान कंपनीने कुणाल कामरावर सहा महिन्यांची बंदी घातली आहे.

कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी मुंबई लखनऊ या इंडिगोच्या विमानातून प्रवास करत होते. तेव्हा कुणाल कामराने अर्णब गोस्वामीवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. कामरा म्हणाला की, “दर्शकांना हे जाणून घ्यायचे आहे की अर्णब गोस्वामी भेकड आहेत की देशभक्त? मी तुकडे तुकडे गँगचा भाग आहे, तुम्ही माझी हवा काढायला पाहिजे. देशाच्या शत्रूंना तुम्ही बाहेर काढले पाहिजे. देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित आहे की नाही हे तुम्ही ठरवले पाहिजे. तुम्ही माझ्या नम्रतेच्या लायकीचे नाही असे कामरा म्हणाला. तसेच हे रोहित वेमुलाच्या आईसाठी आहे, त्यांच्या जातीची चर्चा तुम्ही तुमच्या कार्यक्रमात केली. हे करणे योग्य नाही हे मला माहित आहे असे कुणाल म्हणाला.


त्याचा व्हिडीओ कुणाल कामराने आपल्या ट्विटवर शेअर केला आहे. हे मी माझा हिरो रोहित वेमुलासाठी केले आहे अशी कॅप्शन कुणालने दिली आहे. इंडिगोने कुणाल कामरावर कारवाई करत त्यावर सहा महिन्यांची बंदी घातली आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई केल्याचे इंडिगोने म्हटले आहे. एअर इंडियानेही या व्हिडीओची दखल घेत कामरावर सहा महिन्यांची बंदी घातली आहे.


कुणालने एक मोठी पोस्ट लिहून आपल्या कृत्याचे समर्थन केले आहे. कामराने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जेव्हा फ्लाईटच्या कर्मचाऱ्यांनी मला सीटवर बसण्यास सांगितले तेव्हा मी 20 सेकंदाच्या आत मी जागेवर बसलो. मी विमानाच्या सर्व कर्मचाऱ्यांची माफी मागतो. एक प्रवासी सोडून मी सर्व प्रवाशांचीही माफी मागतो. मी जे काही केले त्यात काही चुकीचे नव्हते असेही कामराने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या